सावत्र सासऱ्याने काढला जावयाचा काटा...हे होतं कारण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

वडिलांच्या निधनानंतर त्यांची मुलगी पतीसह माहेरी राहायला आली होती. त्यामुळे मुळचा कर्जत येथील मयूर काळे हा पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर आईने तेथीलच सचिन काळे याच्यासोबत दुसरा विवाह करुन घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले. 

श्रीरामपूर : सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरुन झालेला वाद विकोपाला जावून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारूच्या नशेत जावयाचा काटा काढला. लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयाचा खून केल्याची घटना तालुक्‍यातील मुठेवाडगाव शिवारात आज (शुक्रवारी) पहाटे घडली. मयूर आकाश काळे (वय 28, रा. मूळ कर्जत, हल्ली रा. मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृत जावयाचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. 

हेही वाचा- वो बुलाती है, मगर जाने का नही.. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांची मुलगी पतीसह माहेरी राहायला आली होती. त्यामुळे मुळचा कर्जत येथील मयूर काळे हा पत्नीसमवेत पाच वर्षांपासून मुठेवाडगाव येथे राहत होता. काही दिवसांनंतर आईने तेथीलच सचिन काळे याच्यासोबत दुसरा विवाह करुन घर सोडले. मुलगी व जावयाकडे असलेल्या दागिन्यांच्या मागणीसाठी आईने पती सचिन काळे याला मित्रांसोबत मुलीकडे पाठविले. 

मध्यस्ती करणाऱ्याचे घर पेटविले

गुरुवारी (ता.7) रात्री नऊच्या सुमारास सचिन काळे (रा. मुठेवाडगाव), संदीप काळे (रा. भेंडाळा, ता. गंगापूर) व बुंदी भोसले (रा. मिरजगाव, ता. कर्जत) व एक अल्पवयीन आरोपी मयूर याच्या घरी गेले. तेथे त्यांनी मयूर व त्याची पत्नी मोनिका (वय 23) यांच्याकडे सोन्याच्या दागिन्याची मागणी केली. त्यावेळी हे सर्व दारूच्या नशेत होते. वाद विकोपाला गेल्यानंतर सचिन याने लोखंडी पाइप, तलवार, दांडा व दगडाने मयूरला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या वेळी त्यांनी मोनिकालाही मारहाण केली. त्यात ती जखमी झाली. मयूरचा भाऊ तैमुर काळे हा वाद सोडविण्यासाठी गेला असता, आरोपींनी त्याचे घर पेटवून दिले. 

तीन आरोपींना अटक

या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मसुद खान यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. मोनिका काळे हिच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी सचिन काळे, संदीप काळे व बुंदी भोसले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. घटनेनंतर चारही आरोपी पसार झाले होते. परंतु, पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, एन. आर. बर्डे, ई. डी. पवार यांच्या पथकाने तातडीने त्यांचा शोध घेऊन सचिन, सूरज व बुंदी यांना सकाळी अटक केली. आरोपी संदीप हा पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of one by father-in-law for gold jewelery