नगर जिल्ह्यात कशाचे संशोधन झाले तर बेडकांचे, ३१ प्रजाती आढळल्या

अमित आवारी
Tuesday, 22 December 2020

या सर्वेक्षणात जिल्हाभरातील 25 निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी 31पेक्षा अधिक प्रजातींच्या बेडकांची नोंद घेतली.

नगर ः अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी, जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रातर्फे या पावसाळ्यात पहिल्यांदाच जिल्ह्यात उभयचर प्राणी सर्वेक्षण करण्यात आले. निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या उपक्रमान्वये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पानथळ ठिकाणी तसेच आपल्या परिसरात आढळणाऱ्या बेडकांचे छायाचित्रे संकलित केले गेले. 

हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते गेले काँग्रेसमध्ये

या सर्वेक्षणात जिल्हाभरातील 25 निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी 31पेक्षा अधिक प्रजातींच्या बेडकांची नोंद घेतली. या उपक्रमात आढळून आलेल्या वैविध्यपूर्ण बेडकांची अचुक ओळख पटवण्याचे व त्यांच्याबाबत अधिक सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याचे कार्य राज्यातील सुप्रसिद्ध उभयचर प्राणी अभ्यासक डॉ. वरद गिरी व प्राणीशास्त्रज्ञ डॉ. सुमन पवार यांनी केले.

या सर्वेक्षण उपक्रमात आशा कसबे यांनी घेतलेली बलुन फ्रॉगची नोंद, भट्टीवाडी (करंजी) येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेली फन्गॉईड व देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या इंडियन बुलफ्रॉगची नोंद, रविंद्र गोल्हार यांनी घेतलेली कॉमन ट्री फ्रॉगची नोंद तसेच स्नेहा ढाकणे यांनी घेतलेली.

राईस फ्रॉगची नोंद अशा नोंदी या वर्षीच्या सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपूर्ण व महत्वाच्या ठरल्या. यांच्यासह प्रतिम ढगे, अमित गायकवाड, शिवकुमार वाघुंबरे, सचिन चव्हाण, संदीप राठोड, अक्षय पाभारे, संजय बोकंद, खुशाल शिंदे आदी सहभागी झाले. 

 

सर्वप्रथम पृथ्वीवर जलचरांच्या रुपाने जीवसृष्टीचा उगम झाला. उभयचरवर्गीय प्राणी हे जलचर व भूचर प्राण्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहेत. निसर्गचक्रात या उभयचरांना महत्वाचे स्थान असूनही हा घटक मात्र दुर्लक्षितच राहतो. या घटकांवरही जाणीवपूर्वक अभ्यास, निरीक्षण व नोंदी होणे गरजेचे आहे. या उद्देशाने या उपक्रमाचे जिल्ह्यात आयोजन केले गेले. 
- जयराम सातपुते, निसर्ग अभ्यासक 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Nagar district, 31 species of frogs were found