नाशिक विभागात नगर जिल्ह्याचे काम अव्वल; मतदारयादीच्या विशेष पुनर्रिक्षणचे काम सुरु

अमित आवारी
Friday, 1 January 2021

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदारयादीच्या विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत निर्दोष मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

अहमदनगर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदारयादीच्या विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गत निर्दोष मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत नगर काम अव्वल ठरले आहे, असे मत सहायक आयुक्त कुंदन सोनवणे व्यक्त केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा निवडणूक शाखेत पार पडलेल्या बैठकीत सहायक आयुक्त सोनवणे यांनी जिल्ह्यातील मतदारयादी विशेष पुनर्रिक्षण कामांचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, आंबिका नक्का, निसार काजी आदी उपस्थित होते. यावेळी मतदार यादीविषयक कामांची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली. 

आढावा बैठकीनंतर सहायक आयुक्त सोनवणे म्हणाले, निर्दोष मतदारयादी तयार करण्याच्या दृष्टीने छायाचित्र मतदारयादीचे काम सुरू आहे. नवीन नावनोंदणी, दुरूस्ती आणि वगळणीच्या अर्जावर निर्णय घेतला जात आहे. जिल्ह्याच्या यादीत फोटो नसलेले 1 हजार 726 मतदार असून त्यापैकी 1 हजार 200 अर्जाचे काम पूर्ण झाले आहे.

दुबार नावे असलेल्या 4 हजार 873 पैकी 2 हजार 910 नावे वगळण्यात आली आहेत. तर, उर्वरित काम येत्या मंगळवार (ता. 5) पर्यंत तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 6 प्रकारचे मॅप 100 टक्के पूर्ण झाले आहे. याबरोबरच तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारींचे 100 टक्के निवारण केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याचे काम नाशिक विभागात अव्वल असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar district tops election work in Nashik division