Nagar : पोलिस अधिकाऱ्यांची बदलीसाठी फिल्डिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

Nagar : पोलिस अधिकाऱ्यांची बदलीसाठी फिल्डिंग

श्रीगोंदे : गेल्या काही महिन्यांत पोलिस अधिकाऱ्यांची वरकरणी वाटणारी शांतता आता लगबगीत बदलली आहे. जुन्या गुन्ह्यातील आरोपींची धरपकड करण्यात यशस्वी ठरलेले पोलिस ताज्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. श्रीगोंदे व बेलवंडी पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची ही अवस्था असून, आता त्या अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहेत. अनुभवाचा फायदा घेऊन अनेकांनी त्यांचे वजन वापरून इच्छितस्थळी बदलीसाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे.

श्रीगोंदे व बेलवंडी हे दोन पोलिस ठाणी आहेत. ११५ महसुली गावांतील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांत मोठ्या गुन्ह्यांना सामोरे जावे न लागल्याने, एका अर्थी शांतता होती. मात्र, किरकोळ गुन्ह्यांसह घडणारे चोऱ्यांचे सत्र सामान्यांच्या मनात धडकी भरवीत आहे. दोन्ही पोलिस ठाण्यांच्या भागात होणाऱ्या चोऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून होत असून, हे गुन्हे उघड करण्यास पोलिस अपयशी ठरल्याने भीती अजूनच वाढत आहे.

श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी कामापेक्षा स्वभावानेच सगळ्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दालनात गेलेल्या व्यक्तीला त्यांनी बोलण्याची संधी न देता कामाला प्राधान्य दिल्याचे लोक सांगतात. ढिकले यांनी तालुक्यातील नेत्यांचे संबंध चांगले जपल्याने त्यांच्यावर नेत्यांची कृपादृष्टी राहिल्याचे दिसले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने जुन्या वाँटेड आरोपींच्या मुसक्या आवळण्यात मोठी भूमिका बजावल्याने श्रीगोंदे पोलिस ठाण्याचा कारभार चांगल्या दृष्टीने वरिष्ठांच्या नजरेत आला. मात्र काही महिन्यात झालेल्या चोऱ्यांमधील आरोपी सापडत नाहीत. त्याकडेही पोलिसांचे लक्ष असले पाहिजे. बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ वादग्रस्त राहिले आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेकांच्या वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यातच त्यांच्या हद्दीत झालेल्या चोऱ्यांचा त्यांना तपासही लावता आलेला नाही. त्यामुळे दुधाळ यांची बदली कुठे व कधी होते, याची विचारणा बेलवंडीकर सतत करीत आहेत.

दरम्यान, या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची बदलीसाठी फिल्डिंग लागली आहे, तसा येथे येण्यासही काहींचा संपर्क झाल्याची माहिती आहे. त्यासाठी काही नेत्यांशी चर्चाही झाली आहे. श्रीगोंद्याच्या लगत असणाऱ्या तालुक्यातील पोलिस अधिकारी श्रीगोंद्यात येत असल्याची कुणकुण आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याचीही चर्चा आहे. एकंदरीतच, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीची सध्या जोरदार चर्चा आहे, हे मात्र निश्चित.

Web Title: Nagar Police Officers Transfer Fielding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..