नगर-पुणे एसटी प्रवास भाडे तब्बल ५० रूपयांनी वाढले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेरणे फाटा व भीमा कोरेगाव परिसरात एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता

नगर : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पुणे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली होती. त्यामुळे दोन दिवसांसाठी एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ केली. 

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेरणे फाटा व भीमा कोरेगाव परिसरात एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. त्यामुळे नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. 31 डिसेंबर रात्री 12 वाजेपासून दोन जानेवारी सकाळी सहा वाजेपर्यंत हा आदेश लागू केला होता.

पुण्याकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस बेलवंडी फाटा ते नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ-मढेवडगाव-काष्टी-दौंड-सोलापूर-पुणे रस्त्याने केली होती. त्यामुळे प्रवाशांना 210, तर शिरूरमार्गे जाण्यासाठी 150 रुपये भाडे एसटीकडून आकारले जात होते.

पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या 31 डिसेंबरला दुपारपासूनच कमी झाली होती. त्यामुळे नगर, औरंगाबाद, जालना, नंदुरबार, बीड, आदी जिल्ह्यातून एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. दोन जानेवारीपासून एसटीची पुण्यासाठी असलेली बससेवा पूर्ववत सुरु होणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar-Pune ST fare increased by Rs 50