पत्रव्यवहारावरून दावे- प्रतिदावे; नगर जिल्हा परिषदेने सुटीच्या दिवशी पाठविले वनविभागाला पत्र

दौलत झावरे 
Tuesday, 10 November 2020

जिल्हा परिषदेच्या आज (मंगळवारी) होणाऱ्या ऑनलाइन सभेला वनाधिकाऱ्यांना न बोलाविल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अहमदनगर (अहमदनगर) : जिल्हा परिषदेच्या आज (मंगळवारी) होणाऱ्या ऑनलाइन सभेला वनाधिकाऱ्यांना न बोलाविल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने वन विभागाशी शनिवारीच (ता. ७) पत्रव्यवहार केल्याचा दावा केला आहे. तसे पत्रावरही नमूद केलेले आहे; मात्र शनिवारी सुटीच्या दिवशी काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ‘कार्यपद्धती’बाबत सदस्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. 

पाथर्डी तालुक्‍यात महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना केल्या, याची माहिती घेण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये वनाधिकाऱ्यांना बोलाविणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले होते. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्तही प्रसिद्ध केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने वन विभागाशी शनिवारीच (ता. 7) पत्रव्यवहार केल्याचा दावा केला आहे. पत्रावरही तशी तारीख आहे. मात्र, त्याच्या आवक-जावक क्रमांकावर खाडाखोड आहे. दुसरीकडे वन विभागाला आज हे पत्र मिळाले. त्यामुळे हा पत्रव्यवहार नेमका झाला कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, शनिवारची सुटी असताना प्रशासनाने पत्रव्यवहार कसा केला, असाही प्रश्‍न आहे. जिल्हा परिषद सदस्यांना पाठविलेल्या नोटिशीवर 23 ऑक्‍टोबर, तर वन विभागाला पाठविलेल्या पत्रावर सात नोव्हेंबरला तारीख असल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरच सदस्यांनी शंका उपस्थित केली आहे. 

जिल्हा परिषदेने ऑनलाइन सभेबाबत पाठविलेले पत्र आमच्या कर्मचाऱ्यांनी मला दाखविले आहे. या सभेसाठी मी उपस्थित राहणार असल्याचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेची सभा ऑनलाइन असल्याने वनाधिकाऱ्यांना सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यांच्याच कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होऊन सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायचे आहे. पत्र शनिवारी की सोमवारी मिळाले, हे महत्त्वाचे नाही. सभेसाठी उपस्थिती महत्त्वाची आहे. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar Zilla Parishad sent a letter to the Forest Department on holiday