अहमदनगर : नगरकर खातात रोज आठ टन आंबा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 आंबा

अहमदनगर : नगरकर खातात रोज आठ टन आंबा!

अहमदनगर - कोरोनामुळे दोन वर्षे आंब्याची चव चाखता आली नाही. यंदा मात्र शहर आणि जिल्ह्यात रोज तब्बल आठ टन आंब्यांची विक्री होत आहे. यावरूनच आंबाप्रेमी मनसोक्तपणे आमरसाची चव चाखत असल्याचे स्पष्ट होते. अक्षय्यतृतीया संपल्यानंतर आंब्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी, हापूसचे दर ३०० ते ६०० रुपये डझनवर पोचले आहेत. रत्नागिरी, केरळ, गुजरात आणि चेन्नई येथून मोठ्या प्रमाणात आंबा नगर शहरात दाखल होत आहे. शहरात आंब्याचे चार ठोक विक्रेते आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर आंबा वितरित होतो. आंब्याने भरलेले सात ते आठ ट्रक रोज खाली होतात. सलग दोन सीझन लॉकडाउनमध्ये गेले. त्यामुळे गेली दोन वर्षे अनेकांना आंबा चाखायला तर सोडाच, पाहायलाही मिळाला नाही. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यातच आंबा बाजारात उपलब्ध झाला. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर घरोघरी आमरस झाला. त्यानंतर आंब्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यात उन्हाचा पारा वाढल्याने लोक आमरस खाणे पसंत करीत आहेत. मे महिन्यानंतर हापूसचा सीझन संपून गावरान आंबा सुरू होतो. केशर, लालबाग, पायरीदेखील जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात उपलब्ध असतात.

स्थानिक आंब्यांचा तुटवडा

जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक आंबा बाजारात येईल; मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे यंदा स्थानिक आंब्यांचा तुटवडा जाणवणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठातील केशर आंबा बाजारात उपलब्ध झालेला असला, तरी त्याचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे नगरकरांना आणखी महिनाभर तरी हापूस आणि लालबागचीच चव चाखावी लागणार आहे.

असे आहेत दर (डझनप्रमाणे)

३०० ते ६००

रत्नागिरी हापूस

२०० ते ३००

रत्नागिरी पायरी

१५० ते २००

म्हैसूर

१२५ ते १७५

लालबाग

६० ते १२०

केशर

Web Title: Nagarkar Eating 8 Tones Of Mangos Aily

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top