Nagpur : शिक्षक ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीवर; विद्यार्थी वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच

Nagpur : शिक्षक ग्रामपंचायत निवडणूक ड्युटीवर; विद्यार्थी वाऱ्यावर

नागपूर : जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोमात सुरू आहे. येत्या १८ डिसेंबरला ग्रामपंचायतसाठी मतदानाची प्रक्रियाही पार पडणार आहे. निवडणुका शांततेत व्हाव्यात यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी चालविली आहे. निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे. परंतु हे ड्युटी लावत असताना एक शिक्षकी व दोन शिक्षकी शाळांतील शिक्षकांची ड्युटी लावल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे.

नागपूर तालुक्यात केवळ १९ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. तरीही तेथे तहसीलदारांनी जि.प.च्या एक व दोन शिक्षकी शाळांवरील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावले आहे. परिणामी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी एक व दोन शिक्षकी शाळा बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. एक व दोन शिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांना वगळून बहुशिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांना निवडणुकीची कामे द्यावी. अशा आशयाचे पत्र गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. मात्र याची दखल न घेतल्याने शनिवारी एक शिक्षकी शाळा बंद ठेवाव्या लागण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या कामाची जबाबदारी एक व दोन शिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांवर देण्यात आली आहे. यामुळे शालेय पोषण आहार वितरित करण्याला शिक्षक नसल्याने अशा शाळांपुढे अडचण निर्माण झाली आहे. काही शाळांतील विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप झालेले नाही. यासंदर्भात शाळा समिती व पालकांनी सभापती यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.