
Nagpur : दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुटे भाग महागले
नागपूर : इंधन दरवाढीचा फटका वाहनक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला असून, वाहनांच्या सुट्या भागांचा उत्पादन खर्च, तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे चालकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. त्यामुळे वाहनदुरुस्तीही महागली आहे. महागाईमुळे खाद्यान्न खरेदी करणे कठीण झालेले असताना आता वाहन चालविण्यासाठीही खिशाचा विचार करावा लागतो आहे. कार व दुचाकी वाहनांचे सुटे भाग, टायर, ऑईलच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रॉ-मटेरिअल महाग झाल्याने वाहनांच्या सुट्या भागांमध्ये अधिक तेजी आली आहे. दुचाकीची क्लच प्लेट ३८० रुपयांची होती ती आता ४७० रुपयांवर पोहोचली आहे. तसेच ६६० रुपयात मिळणारे पिस्टन ८०० रुपये आणि चैन स्पॉकिट सेट ८० ते ९० रुपये वाढून १०५० रुपयांवर गेले आहे.
कारपासून दुचाकीच्या इंजिन ऑईलमध्ये ४० ते ५० रुपयांची वाढ झालेली आहे. १७० ते १८० रुपयांत मिळणारे ऑइल २३० ते २५० रुपये प्रतिलीटरवर गेले आहे. चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये गुणवत्तेनुसार किमती वाढल्या आहेत. स्प्लेंडरचा टायर पूर्वी १ हजार १५० रुपयाचा होता तो आता १,२५० ते १,३०० रुपये तर ट्यूब ३५० रुपयांवर पोहोचला आहे.
कार ॲसेसरिजमध्ये व्हील कव्हर ३५० चे ४०० रुपयात मिळत आहे. सीट कव्हरच्याही किमतीही वाढल्या आहेत. १०० ग्रॅमची ग्रीसची डबी १७ रुपयात मिळत होती ती आता २२ ते २५ रुपयावर गेली आहे. बॅटरीच्या किमतीतही ७० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे..
वाहनांच्या सुट्या भागांचे दर
साहित्य आधीचे दर(रु) आताचे दर(रु)
चेन स्पॉकिट सेट ९५० १,०५०
पिस्टन ६६० ८००
क्लच प्लेट ३८० ४५०
ऑइल १८० २५०
दुचाकी टायर १,१५० १,३००
कार टायर ४,००० ४,६००
कार व्हील कव्हर ३५० ४००
कच्च्या मालासह इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सर्वच वाहनांचे सुटे भाग १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. परिणामी, खूपच गरज असेल तरच वाहनांना नवीन सुटे भाग टाकले जात आहेत. सूटे भाग विक्रेत्यांच्या व्यवसायातही घट झालेली आहे.
- अभिलाष अग्रवाल,स्पेअर पार्ट विक्रेता
इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी सर्व सुट्या भागांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. हा खर्च अंतिमत: ग्राहकांवरच पडत आहे.
- फारुक अकबानी,सचिव, कॅट नागपूर