esakal | सायकलवरुन विश्वशांतीचा संदेश देणारा अवलिया नागराज गौडा
sakal

बोलून बातमी शोधा

Nagraj Gowda preaching the message of world peace on a bicycle

पाणी वाचवा या सारखे सामाजिक संदेश देत मुंबईहून सायकलवर निघालेले नागराज गौडा (वय 55) हे गृहस्थ संगमनेरात आले.

सायकलवरुन विश्वशांतीचा संदेश देणारा अवलिया नागराज गौडा

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : सुमारे तीन वर्षांपासून कोणतीही प्रसिध्दी अथवा पुरस्काराची अपेक्षा न ठेवता समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विश्वशांती व वृक्षलागवड, पाणी वाचवा या सारखे सामाजिक संदेश देत मुंबईहून सायकलवर निघालेले नागराज गौडा (वय 55) हे गृहस्थ संगमनेरात आले. कुटूंबाचा व्याप नसल्याने सडाफटींग असलेले नागराज गौडा हे गृहस्थ मुळचे कर्नाटक राज्यातील आसून या शहरातील. 

शिक्षण दहावीपर्यंत झालेले मातृभाषेसह हिंदी व जुजबी इंग्रजी भाषा ते बोलतात. वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी राजधानी दिल्लीत मुक्त छायाचित्रकार म्हणून काम केले. तोच त्यांच्या उपजिवीकेचा मार्ग होता. त्यानंतर अनेकांप्रमाणे त्यांनाही मुंबईच्या मोहमयी दुनियेचा ओढा लागल्याने, चित्रपटसृष्टीत काम करण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले. अंधेरी (पूर्व) येथील नातेवाईकाकडे राहू लागले. या दरम्यान काही चित्रपटातून सहकलाकाराच्या फुटकळ भुमिकाही केल्या. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र, एका जागी रमण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने व कुटूंब कबिल्याचे पाश नसल्याने त्यांनी साध्या सायकलवरुन देश फिरण्याचा चंग बांधला. तहानलाडू भुकलाडू, गरजेचे सामान, अंथरुण आणि भक्कम जिद्द या भांडवलावर 3 डिसेंबर पासून 2017 पासून त्यांनी मुंबईतून विश्वशांती, देशभक्ती सायकल यात्रेला सुरवात केली.

पाणी वाचवा, वृक्षारोपण, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, गोरक्षण आदी बाबतीत वाटेतील मुक्कामात भेटणाऱ्यांचे प्रबोधन करीत त्यांची सायकल यात्रा सुरु झाली. दररोज सुमारे 70 ते 100 किलोमिटरचा प्रवास ते करतात. वाटेत येणाऱ्या गावातून कोणी नाष्टा, चहापाणी, जेवणाची सोय केली तर ठीक, अन्यथा लोकांनी प्रेमाने दिलेल्या पैशातून ते खर्च भागवतात. मिळेल त्या मंदिर, आश्रमात पथारी टाकतात.

मुंबईतून सुरु झालेली सायकल यात्रा गुजरात, पाकिस्तान सीमेवरील कच्छ,राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक मार्गे ते कोल्हापूर वरुन सातारा, कऱ्हाड, पुणे, भिमाशंकर, शनि शिंगणापूर, शिर्डीवरुन संगमनेर मार्गे नाशिकच्या त्र्यंबकेश्वराकडे निघाले आहेत. मध्यंतरीच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात 11 महिने त्यांना नाईलाजाने मुंबईत थांबावे लागले होते. दिड महिन्यांपूर्वी त्यांची पुन्हा भटकंती सुरु झाली आहे बंगलोर हुबळी, धारवाडमार्गे ते कोल्हापूरात पोचले. नाशिकमधून मुंबई किंवा गुजरात, ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड असा प्रवास करण्याचा त्यांचा मानस आहे.

आजपर्यंत त्यांनी 12 राज्यातून प्रवास केला आहे. या प्रवासात आलेल्या अनेक अनुभवांनी त्यांचे भावविश्व समृध्द झाले आहे. सुदैवाने कोणतेही संकट आले नसले तरी, राजकारणी व स्वयंसेवी संस्था मदत करीत नाहीत याची खंत व्यक्त करताना सर्वसामान्य जनतेमुळे खुप मदत मिळत असल्याने प्रवास सुकर होत असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले. या प्रवासात अनेक राजकिय नेते, अभिनेते, व्यापारी, उद्योजक व मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीच्या आठवणी त्यांनी छायाचित्राच्या रुपाने जतन केल्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image