महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सात नविन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National recognition seven new varieties of crop Mahatma Phule Agricultural University

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सात नविन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ व उडदाच्या वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रिय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. उसाचा फुले ११०८२ (कोएम ११०८२), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तूरीचे फुले तृप्ती व फुले कावेरी, तीळ पिकाचा फुले पुर्णा आणि उडदाचा फुले वसु या वाणांचा समावेश आहे.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व विद्यमान संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, ज्वारी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दिपक दुधाडे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे व जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ. संजीव पाटील, डॉ. सुमेरसिंग राजपूत यांच्यासह पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, निफाड येथील कृषी संशोधन केंद्र, ज्वारी सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व तेलबिया संशोधन केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी या वाणांसाठी पुढाकार घेतला.

ऊस पिकाचा फुले-११०८२ हा लवकर पक्व होणार्या वाणाचे ऊस उत्पादनात १५.४० टक्के, साखर उत्पादन १३.५२ टक्के, हा वाण तुल्यवाण कोसी ६७१ पेक्षा सरस आढळून आला आहे. साखर उतारा कोसी ६७१ इतकाच १४.१७ टक्के मिळाला आहे. गव्हाचा सुधारीत वाण फुले अनुपम (एन.आय.ए.डब्ल्यु. ३६२४) या वाणाची महाराष्ट्रामध्ये नियंत्रित पाण्याखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. हा वाण आकर्षक टपोरे दाणे, प्रथिनांचे प्रमाण ११.४ टक्के असून तांबेरा रोगास प्रतिकारक्षम तसेच चपातीसाठी उत्तम वाण आहे.

रब्बी ज्वारीचा फुले यशोमती (आर.एस.व्ही. १९१०) हा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी ९.३ क्वि. असून उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी १२.०० क्वि. आहे. तूरीचा फुले तृप्ती (पी.टी.१०-१) हा वाण देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी २२.६६ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाची उच्च उत्पादनक्षमता प्रति हेक्टरी ३२.०० क्विंटल इतकी आहे.

तुरीचा दुसरा वाण फुले कावेरी (पी.टी.११-४) हा देशाच्या दक्षिण विभागातील तामिळनाडु, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि ओडीशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत तसेच बागायत लागवडीसाठी प्रसारीत करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रति हेक्टरी १५.९१ क्विंटल उत्पादन मिळते. तीळ या पिकाचा जे.एल.टी. ४०८-२ (फुले पूर्णा) हा वाण महाराष्ट्रातील खान्देश आणि मराठवाडा विभागातील उन्हाळी हंगामासाठी प्रसारीत करण्यात आला आहे. याचे उत्पादन ७०५ किलो प्रति हेक्टर असून यामध्ये तेलाचे प्रमाण ४९ टक्के आहे.

उडदाचा पियु ०६०९-४३ (फुले वसु) हा वाण महाराष्ट्रातील उडीद पिकवणार्या भागासाठी प्रसारीत करण्यात आला असून या वाणाची अधिकतम उत्पादनक्षमता १९ क्विं./हे. आहे. या वाणाचा टपोरा दाणा असून १०० दाण्याचे वजन ४.८७ ग्रॅम आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शेतकऱ्यांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा कायम आहे. यावर्षी देखील राष्ट्रीय स्तरावर सात वाणांना मान्यता देण्यात आली, याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे .

- कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील