esakal | महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी यांचे निधन

बोलून बातमी शोधा

निर्मला मालपाणी
महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष मालपाणी यांचे निधन
sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष, राहुरी खुर्दच्या विद्यमान सरपंच निर्मला मदनलाल मालपाणी (वय 71) यांचे काल (गुरुवारी) मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. महिलावर्गाच्या "आयकॉन' निर्मला मालपाणींचा चाळीस वर्षांचा सामाजिक, राजकीय प्रवासाचा झंझावात विसावला.

राहुरी खुर्द येथे 43 वर्षांपूर्वी त्यांनी कापड व्यवसाय सुरू केला. दांडगा जनसंपर्क अन्‌ नेतृत्वगुण यांचा मिलाफ घडला. त्याच जोरावर 40 वर्षांपासून त्या ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच राहिल्या. 1984 मध्ये अहिल्यादेवी महिला लघुउद्योग सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेची स्थापना त्यांनी केली. शेकडो महिलांना रोजगार दिला. जिल्ह्यातील महिला सहकारी संस्थांचे फेडरेशन असलेल्या जिल्हा महिला सहकारी संघाची स्थापना केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या त्या विश्‍वासू कार्यकर्त्या राहिल्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील यशस्विनी अभियानाच्या उत्तर महाराष्ट्राच्या समन्वयक राहिल्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष झाल्या. जिल्ह्यातील व राज्यातील अनेक आंदोलने त्यांनी गाजविली.

जिल्हा माहेश्‍वरी महिला मंडळ, जिल्हा माहेश्‍वरी समाज कल्याण निधी, माहेश्‍वरी विद्या प्रसारक मंडळ (पुणे), जिल्हा कारागृह सुधारणा समिती, राहुरी तालुका मोफत कायदेविषयक सल्लागार समिती, निर्मल महिला व बालकल्याण प्रतिष्ठान, राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्रतिष्ठान, अंबिका ज्युनिअर चेंबर, अहिल्यादेवी महिला विकास मंडळ, नगर जिल्हा महिला विकास मंडळ, राज्य महिला विकास पतसंस्था फेडरेशन, ज्ञानगंगा वाचनालय, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग आदींच्या माध्यमातून त्यांनी कामाचा ठसा उमटवला. "सकाळ एक्‍सलन्स ऍवॉर्ड 2019'सह विविध पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या.

त्यांच्या मागे पती मदनलाल मालपाणी, मुलगा योगेश व नीलेश, मुलगी डॉ. वर्षा नितीन झंवर (कोपरगाव), अश्‍विनी सुनील कुमावत (राहुरी), सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण करणाऱ्या निर्मला मालपाणी यांनी जनमानसात आदरयुक्त लोकप्रियता मिळविली.