शेवगाव : सर्वाधिक २६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व; कोळगे यांचा दावा

सचिन सातपुते
Thursday, 21 January 2021

तालुक्यातील ४८ ग्रामंपचायतीसाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर झालेल्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निकालानंतर सर्वाधिक २६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने त्या खालोखाल ८ ठिकाणी भाजपने, एक ठिकाणी जनशक्ती विकास आघाडीने तर १३ ग्रामपंचायतीवर विविध पक्षांच्या आघाडीने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचा जनाधार पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर असल्याचे सिध्द झाले आहे.

तालुक्यातील ४८ ग्रामंपचायतीसाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर झालेल्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागून सत्तांतर घडल्याने जुन्या प्रस्थापितांना मतदारांनी डावलत तरुणांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांना पिंगेवाडीत तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांना मजलेशहरमध्ये, माजी तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर यांना ढोरजळगाव शेमध्ये, माजी जिल्हा परिषद  सदस्य बाळसाहेब सोनवणे यांना आखातवाडे येथे मतदारांनी धोबीपछाड दिला. तर जुने दहिफळ येथे पंडीत भोसले, नवीन दहिफळ येथे संजय शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ कातकडे यांना ठाकूर निमगाव येथे, सरपंच राजेश फटांगरे यांना भातकुडगाव येथे तर घोटण येथे सरपंच अरुण घाडगे, वाडगाव येथे सरंपच सुनिता जवरे यांना पराभव स्विकारावा लागला.

श्रीगोंदा तालुक्यात जगताप-नागवडेंसह अण्णाही उतरणार मैदानात

तालुक्यातील बक्तरपूर, भाविनिमगाव, आखातवाडे, पिंगेवाडी, ढोरजळगाव शे, राक्षी, कोनोशी, अंतरावाली खुर्द, मजलेशहर, सुलतानपूर खुर्द, लखमापूरी, सुकळी, आधोडी, गायकवाड जळगाव, भातकुडगाव, चेडे चांदगाव, निंबेनांदुर, वरखेड, मळेगाव शे, हातगाव, नागलवाडी, तळणी, दहिगाव शे, सोनेसांगवी, ताजनापूर, गदेवाडी अशा २८ ग्रामपंचायतीवर माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकल्याचा दावा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाकार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केला आहे. तर भाजपने ठाकूर पिंपळगाव, शेकटे बुद्रुक, वाडगाव, राणेगाव, ढोरजळगाव ने, बेलगाव, ठाकुर निमगाव, आंतरवाली बुद्रुक या आठ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. तर दादेगाव येथे जनशक्ती विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. तर उर्वरीत बोडखे, खुंटेफळ, कोळगाव, हसनापूर, कांबी, जुने दहिफळ, चापडगाव, नवीन दहिफळ, घोटण, सोनविहीर, नजिक बाभुळगाव, आव्हाणे खुर्द, शिंगोरी येथे राष्ट्रवादी, भाजप, जनशक्ती, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सावली दिव्यांग संघटना अशा सर्वपक्षीय आघाडीने स्थानिक पातळीवर वेगवेगळया ठिकाणी सत्ता काबीज केल्याचा दावा केला आहे.

सुधारित पाणीयोजनेच्या कामास लवकरच सुरवात

ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचे समिकरणे जुळवतांना बहुतांशी गावात कार्यकर्ते स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्ष व संघटनांशी हातमिळवणी करत असतात. त्यामुळे निकाल लागल्यानंतर सर्व पक्षीय पदाधिका-यांकडून ग्रामपंचायत ताब्यात आल्याचे दावे प्रतिदावे केले जातात. तालुक्यातही निवडणुकीनंतरचे हे सत्र सुरु झाले आहे. मात्र तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवल्याने राष्ट्रवादीचा तालुक्यातील जनाधार कायम असल्याचे निकालावरुन दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NCP mass base in shevgaon taluka has once again proved to be number one