सुधारित पाणीयोजनेच्या कामास लवकरच सुरवात

विलास कुलकर्णी 
Thursday, 21 January 2021

पालिकेची सुधारित पाणीयोजना 25 कोटी 93 लाख रुपयांची आहे. मुळा धरणातून अशुद्ध पाण्याचा उपसा करून, ते जलशुद्धीकरण केंद्रात पोचविणारी मशीनरी व सौरऊर्जा प्रकल्प आदी कामांची स्वतंत्र निविदाप्रक्रिया होणार आहे.

राहुरी (अहमदनगर) : शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचे मुळा धरण येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, गुरुत्ववाहिनी, दोन जलकुंभांची बांधकामे व अंतर्गत वितरणाच्या जलवाहिनींच्या कामांसाठी 19 कोटी 75 लाखांची निविदा प्रसिद्ध झाली. लवकरच ठेकेदाराची नियुक्ती होऊन, सुधारित पाणीयोजनेच्या कामास सुरवात होईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
याबाबत मंत्री तनपुरे म्हणाले, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या शासन निर्णयातून, खास बाब म्हणून राहुरी पाणीयोजनेच्या कामाला सूट दिल्यामुळे निविदाप्रक्रिया सुरू झाली. राहुरी पालिकेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यातील आश्वासनपूर्तीची वाटचाल करताना समाधान वाटते. सन 2050 ची लोकसंख्या गृहीत धरून, सुधारित पाणीयोजनेचा आराखडा केला आहे. राहुरी शहर व सर्व वाड्या- वस्त्यांवर योजनेद्वारे पाणी मिळेल.'

हे ही वाचा : श्रीगोंदा तालुक्यात जगताप-नागवडेंसह अण्णाही उतरणार मैदानात
 
पालिकेची सुधारित पाणीयोजना 25 कोटी 93 लाख रुपयांची आहे. मुळा धरणातून अशुद्ध पाण्याचा उपसा करून, ते जलशुद्धीकरण केंद्रात पोचविणारी मशीनरी व सौरऊर्जा प्रकल्प आदी कामांची स्वतंत्र निविदाप्रक्रिया होणार आहे.

19 कोटी 75 लाखांच्या निविदाप्रक्रियेत समाविष्ट असलेली कामे अशी

मुळा धरणातील जॅकवेलपर्यंतच्या चराचे काम, धरणाजवळ नवीन तीन लाख 50 हजार लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्रापासून राहुरी शहरापर्यंत 9.71 किमी लांबीचे नवीन स्वतंत्र गुरुत्ववाहिनीचे काम, जुन्या गुरुत्ववाहिनीचे तीन किमी लांबीचे दुरुस्तीचे काम, राहुरी येथे मुख्याधिकारी निवासस्थानाजवळील, ३० वर्षांचे विहित आयुर्मान संपलेले जुने जलकुंभ निष्कासित करून, त्या जागी नऊ लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम, येवले आखाडा येथे एक लाख 62 हजार लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे बांधकाम, राहुरी शहर व वाड्या-वस्त्यांवर 77.2 किमी लांबीची अंतर्गत वितरणाची नवीन जलवाहिनी पसरविणे आदी कामे मार्गी लागणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State for Urban Development Prajakt Tanpure has informed that the work of improved water scheme will start soon