"राष्ट्रवादी"च्या स्थापनेवेळी या नेत्यांनी केली सोबत, आता दुरावले अन आली पराभवाची नौबत

NCP's political journey in Ahmednagar district
NCP's political journey in Ahmednagar district

नगर ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला २१ वर्षे झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पी.ए. संगमा,तारीक अन्वर यांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १० जून १९९९ रोजी स्थापना केली. राष्ट्रीय स्तरावरही राष्ट्रवादीने आपला करिष्मा दाखवला, अर्थात पवार यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले. 

देशपातळीवर काँग्रेस फारशी फुटली नाही. मात्र, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने वरचष्मा मिळवला. महाराष्ट्रात काँग्रेस संपते की काय अशी स्थिती होती. त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात. नगर जिल्हाही त्यांच्यामागे नेटाने उभा राहिला. तेव्हापासून आतापर्यंतच्या वाटचालीत नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटीच दिली. राष्ट्रवादीच्या वाटचालीचा हा पट...

अकोले तालुक्यातून तत्कालीन आमदार मधुकरराव पिचड, कोपरगावातून शंकरराव कोल्हे, श्रीरामपुरातून भानुदास मुरकुटे, राहुरीतून प्रसाद तनपुरे, नगर तालुक्यातून दादापाटील शेळके, नगर शहरातून माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नेवाशातून माजी खासदार यशवंतराव गडाख, पारनेरमध्ये वसंतराव झावरे, श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते, शेवगावातून मारूतराव घुले पाटील, पांडुरंग अभंग, कर्जतमधून राजेंद्र फाळके आदी नेत्यांनी पवारांचे नेतृत्व मान्य केले आणि काँग्रेसमधून राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केलं.

राष्ट्रवादीचं भवितव्य कसं असेल किंवा आपली राजकीय आत्महत्या तर होणार नाही ना, असा विचार न करता ही मंडळी राष्ट्रवादी झाली.

हे राहिले काँग्रेसमध्येच

सहकारातील मंडळी पवारांच्या मागे उभी राहिली. ही खऱ्या अर्थाने काँग्रेसमधील उभी फूट होती. कारण संगमनेरमध्ये भाऊसाहेब थोरात, श्रीरामपूरमध्ये गोविंदराव आदिक, कोपरगावात शंकरराव काळे, पाथर्डीत अप्पासाहेब राजळे, श्रीगोंद्यात शिवाजीराव नागवडे अशी मोजकीच मंडळी काँग्रेसमध्ये शिल्लक राहिली. असे असले तरी काँग्रेस आणखी खिळखिळी व्हायला पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या शीर्षर्थ नेत्यांना वाटत होतं.

त्या काळात जिल्ह्यातील दुसरे धुरंधर नेते बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेत होते. म्हणजेच काँग्रेसमधील त्यांचा जुना गट आधीच फुटला होता. त्यामुळे काँग्रेस संपवण्यासाठीची संधी म्हणून नगर जिल्ह्याकडे राष्ट्रवादीकडून पाहिलं जात होतं. कर्जत-जामखेड हा भाजपच्या प्रभावाखाली होता. नगर शहरात अनिल राठोड यांच्यामुळे शिवसेना प्रभावशाली होती.

राष्ट्रवादीच्या तत्कालीन राजकीय स्थितीचं राजकीय विश्लेषक, सकाळचे कार्यकारी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील असं विश्लेषण करतात... राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटत होतं, नगर जिल्ह्यात पक्षवाढीला मोठी संधी आहे. त्या काळात होतंही तसंच. त्यामुळे बहुतांशी नेते राष्ट्रावादीत गेले. उर्वरित नेतेही राष्ट्रवादीच्या वाटेवर होते, परंतु त्यांनी आपल्या तालुक्यापुरता विचार केला. आपला विरोधक तिकडे तर आपण इकडेच बरे, असे ते गणित होतं. पक्षांतर करताना वैयक्तिक फायदा पाहिला जात होता. कोपरगावात शंकरराव काळे यांनी काँग्रेस सोडली नाही. श्रीरामपुरात गोविंदराव आदिक यांनी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

असे झाले पुननिर्माण

सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्याला विरोध करून राष्ट्रवादीची स्थापना झाली असली तरी त्यांना राजकारणात सक्रिय होण्यास कोणी विनंती केली होती, असा मुद्दा आदिक यांनी उपस्थित केला होता. त्या काळात आदिक प्रदेशाध्यक्ष होते. नगर क्लबवर झालेल्या मेळाव्यात त्यांनी पवारांवर आरोपांच्या फैरी झाल्या होत्या. त्यावेळी दादाभाऊ कळमकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते पवार समर्थक म्हणून त्यांना काढण्यात आलं. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांना पुन्हा तेच पद देण्यात आलं, अशी आठवण बोठे पाटील सांगतात.

नगरमध्ये घुले पाटलांनी सर्वात अगोदर आपण पवारांसोबत असल्याचे जाहीर केलं होतं. श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते यांनीही तशीच घोषणा केली, असे श्रीगोंद्यातील सकाळचे तालुका प्रतिनिधी संजय काटे सांगतात.

राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर लगेच विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होती. त्यावेळी जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या तर भाजप-शिवसेनाची युती एकत्र होती. त्याचा फायदा त्यांना झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यावेळी भाजपचे दिलीप गांधी विजयी झाले. तेव्हापासून अपवाद वगळता हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला बनला. त्या निवडणुकीत दादापाटील शेळके व काँग्रेसच्या बाबासाहेब भोस यांचा पराभव झाला होता. गांधी यांना २ लाख ७८ हजार, राष्ट्रवादीच्या दादापाटील यांना अडीच लाख तर काँग्रेसच्या भोस यांना १ लाख ८९ हजार मते होती. दोन्ही काँग्रेसच्या मतांच्या विभाजनाचा हा पराभव होता.

पहिल्यांदाच हे आले निवडून

पहिल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला नगरमध्ये पाच आमदार मिळाले. कोपरगावात शंकरराव कोल्हे, राहुरीत प्रसाद तनपुरे, पारनेरमध्ये वसंतराव झावरे, अकोल्यात मधुकरराव पिचड, शेवगावात नरेंद्र घुले पाटील, काँग्रेसला तीन जागा होत्या. संगमनेरातून बाळसाहेब थोरात, श्रीगोंद्यातून शिवाजीराव नागवडे, आणि श्रीरामपुरातून जयंत ससाणे, शिवसेना दोन जागांवर होती. नगरमधून अनिल राठोड तर शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, पाथर्डीत भाजपचे दगडू पाटील बडे यांनी काँग्रेसच्या राजीव राजळे यांचा पराभव केला. नेवासा-नगरमध्ये अपक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी शंकरराव गडाख यांचा पराभव केला.

या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्र्रवादीने एकत्र येत सरकार बनवले. अपक्ष आमदार कर्डिले यांनीही त्यांना पाठिंबा दिला. नंतर ते राष्ट्रवादीतही गेले. जिल्ह्यातून पिचड मंत्रिमंडळात गेले. मात्र, ज्येष्ठ असलेल्या कोल्हे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे ते काहीसे नाराज होते, असे शिर्डीतील सकाळचे प्रतिनिधी सतीश वैजापूरकर सांगतात.

निवडणुकीतील कामगिरी

पक्षाने अनेक चढउतार पाहिले. परंतु लोकांंचा पवार साहेबांवर विश्वास असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात आणि राज्यात वाढतच गेला. सन २००४च्या निवडणुकीत ३, २००९मध्ये ४, २०१४मध्ये ३ जागा मिळाल्या होत्या. अपवाद वगळता राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडीच होती. या निवडणुकीत पक्षासाठी बिकट स्थिती होती. बहुतांशी नेते पक्ष सोडून गेले होते. परंतु पवार साहेबांच्या सभा आणि दिलेले योग्य उमेदवार तसेच प्रचाराचे नियोजनामुळे अभूतपूर्व यश मिळाले. सहा आमदार निवडून आले. एक पुरस्कृतही निवडून आला. ही पक्षासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सरकार आल्याने कार्यकर्त्यांत पुन्हा चैतन्य आले आहे, असं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके सांगतात.

सोबत होते ते दुरावले

अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुरकराव पिचड व त्यांचे पुत्र वैभव हे पवार कुटुंबातील एक घटक होते. परंतु ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी भाजप जवळ केली. कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता याही मागील वेळी भाजपात गेल्या. मतदारसंघातील मतांचे ध्रुूवीकरण रोखण्यासाठीच त्यांचा निर्णय होता. पाचपुते यांनीही विठ्ठलासोबत मतभेद नाही, परंतु इतरांमुले अडचण आहे, असा आरोप करीत भाजपात प्रवेश केला. गडाख कुटुंबीयांनीही राष्ट्रवादी सोडली. पारनेरचे झावरे कुटुंबीयही पवारांसोबत एकनिष्ट होते. परंतु या निवडणुकीत त्यांनी भाजपाची साथ दिली. त्यावेळी काँग्रेसमध्ये थांबलेले कोपरगावचे काळे कुटुंब, श्रीरामपूरचे आदिक कुटुंब राष्ट्रवादी आले. एकंदरीत पक्षस्थापनेवेळी जवळ असलेले लांब गेले. आणि लांब थांबलेले जवळ आले. एेन निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडलेल्या नेत्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने रान पेटवले. त्यांचा पराभव घडवून आणण्याची रणनीती आखली. त्यात त्यांना बऱ्याच अंशी यशही आलं. पाचपुते यांच्यासारखे कसेबसे त्यातून निसटले. शेवगावचे घुले कुटुंब वगळता सर्वांनी एकदा का होईना राष्ट्रवादी विरोधात उमेदवारी केली. नगरमध्ये कोणी कोणत्याही पक्षात असले तरी शरद पवार यांचा सगळेच रिस्पेक्ट करतात. हे त्यांच्या नेतृत्वाचे गमक आहे, असे वैजापूरकर सांगतात.

पवार कुटुंब आणि नगर

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पवार यांचे नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. आता तर पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील रोहित पवार कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या घडामोडीत त्यांचाच वरचष्मा राहणार आहे, हे नक्की. त्यांच्या मताशिवाय एकही निर्णय तडीस जाणार नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com