प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी साडेआठ टक्के व्याज

आनंद गायकवाड
Monday, 2 November 2020

भरपूर लाभाच्या अनुदानासह माफक व्याजदरात सबसिडी देणारी प्रधानमंत्री आवास योजना सर्वांच्या हिताची आहे.

संगमनेर (अहमदनगर) : भरपूर लाभाच्या अनुदानासह माफक व्याजदरात सबसिडी देणारी प्रधानमंत्री आवास योजना सर्वांच्या हिताची आहे. या योजनेसाठी मर्चंट्‌स बॅंकेने साडेआठ टक्के विशेष व्याजदर जाहीर केला आहे. या योजनेतील साडेसहा टक्के सबसिडीनंतर तो फक्त दोन टक्के पडणार आहे.

त्यामुळे संगमनेर मर्चंट्‌स बॅंकेच्या माध्यमातून अधिकाधिक इच्छुकांनी योजनेचा लाभ घ्यावा. या साडेसहा टक्‍क्‍यांमुळे मिळणारी दोन लाख 67 हजारांची सबसिडी मिळवून आपल्या स्वप्नातील घरकुल साकारण्याचे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजना व "भारत पे' ऍपच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ""स्वतःचे घरकुल बांधू इच्छिणाऱ्यांसाठी वरदान असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत देशातील मोजक्‍याच सहकारी बॅंकांचा समावेश आहे. त्यात मर्चंट्‌स बॅंकेचा समावेश होणे, ही संगमनेरला देशपातळीवर बहुमान मिळवून देणारी आहे. तसेच, "भारत पे'च्या माध्यमातून मर्चंट्‌स बॅंकेत खाते असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या सोयीसाठी, कोणताही खर्च न करता मोबाईलद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे.'' 
राष्ट्रीय योगासन खेळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. संजय मालपाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. मालपाणी यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 

नारायण कलंत्री, बांधकाम व्यावसायिक के. के. थोरात, उद्योजक सुरेश राजपाल, डॉ. संजय मालपाणी, बॅंकेचे उपाध्यक्ष संतोष करवा, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सुरम आदींसह बॅंकेचे आजी-माजी संचालक, बांधकाम व्यावसायिक व संबंधित, शहरातील व्यापारी, तसेच उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन बाहेती यांनी केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Near Eight percent interest for houses under Pradhan Mantri Awas Yojana