esakal | कोरोना काळात भेदाभेद अमंगळ, दाखवावे एकीचे बळ
sakal

बोलून बातमी शोधा

The need to show the strength of unity in the Corona period

मानवता ही भारतीय संस्कृतीला मिळालेली सर्वात मोठी देणगी. सर्वधर्मिय ग्रंथांत मानवतेचीच शिकवण दिली आहे. ऋषी-मुनींनीही मानवता हाच खरा धर्म सांगितला. धर्माच्या आचरणावरच समाजाचा हा डोलारा उभा आहे. हेच काम आपल्याला करायचे आहे. कोरोनाचे संकट मोठे असले, तरी त्याला समोरे जाताना एकमेकांविषयी प्रेमभावना जागृत ठेवणे महत्त्वाचे आहे.

कोरोना काळात भेदाभेद अमंगळ, दाखवावे एकीचे बळ

sakal_logo
By
अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील

नगर ः जलप्रलय, भूकंप, अग्नितांडव, चक्रीवादळ हे शब्दच संकटाचा अर्थ घेऊन येतात. त्यातच कोरोनासारख्या शब्दाची भर पडली. या शब्दांचे परिणाम मानवीजातीला सारखेच. भविष्यात अजून काय वाढून ठेवलेय, हे वरील कोणत्याही संकटाच्या आधी कोणीच सांगू शकत नाही.

जलप्रलय आल्यानंतर तो अजून भयानक होईल, भूकंप झाल्यानंतर किती हानी करील, अग्नितांडव झाल्यानंतर किती जणांची होरपळ होईल किंवा चक्रीवादळात किती संसार, जीव उडून जातील, हे सांगणे कठिण असते. असाच प्रकार कोरोनाबाबत होऊ पाहत आहे. त्याची भयानकता कुणीच सांगू शकत नसले, तरी इतर संकटात आपण एकमेकांना जसा आधार देतो, तसाच आधार या संकटातही देण्याची गरज आहे. 

कोरोनाग्रस्त असतील किंवा त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले कुटुंब असेल, प्रत्येकाने आपल्या सद्‌सद्विवेकबुद्धीला अनुसरून आपापल्या परिने संबंधितांना धीर द्यायला हवा. खरं तर मानवतेची साखळी भक्कम असल्याचे अनेक संकटाच्या वेळी दिसून आले. भारतीय संस्कृतीने मानवतेची दिलेली ही मोठी देणगी आहे. संकटकाळात ही साखळी अधिक भक्कम झाल्याचे अनेक उदाहरणांतून दिसून आले. लातूरचा भूकंप असो, की कर्नाटकचे जलप्रलय, संपूर्ण देशाने धावून जात या संकटांचा सामना केला आहे. आजही तीच वेळ आहे. संपूर्ण देशावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी एकमेकांना धीर द्या. आर्थिक विवंचनेत असलेल्यांना आधार द्या. 

अनेक साथ रोग आले पण... 

जगाने पूर्वी अनेक साथ रोग अनुभवले. अबोला, देवीरोग, हत्तीरोग, स्वाईन फ्ल्यू, अशा एक ना अनेक रोगांवर मानवाने यशस्वीरित्या मात केली. पोलिओसारख्या आजाराला नेस्तनाबूत केले. एचआयव्ही, टीबीसारख्या आजारांवर औषधे शोधली. आता नव्याने आलेल्या कोरोनाला हरविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भविष्यात लस येईलही, तरी तोपर्यंत त्यात अनेक जण भरडले जातील. आज काही जात्यात, तर काही सुपात आहेत.

कधी कोणाचा नंबर लागेल, हे सांगणे कठिण असले, तरी आपल्या हाती असलेल्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे, समाज सुरक्षित राहिल की नाही, याची चिंता करण्यापेक्षा स्वतः कसे सुरक्षित राहू, याचाच विचार आधी प्रत्येकाने करायला हवा. असे झाले, तरच समाज सुरक्षित राहू शकेल. यापूर्वी अनेक साथरोगांनी मानवावर, जीवसृष्टीवर आक्रमणे केली; परंतु त्यातून मार्ग काढत मानवाने क्रांती घडवून आणली. कोरोनाबाबतही असेच होत आहे. 

खचलेल्या मनाला हवा आधार 

कोरोनामुळे समाजाचे मन खचते आहे. दिवसेंदिवस समाज मनोमन मरत आहे. काही काम करावं, तर कोरोना मागे लागेल. नाही करावे, तर पोटाला खायचे काय? उपाशी राहून कसे जमेल, हाच सारासार विचार करून सरकारने संपूर्ण लॉकडाऊन टाळले. लोकांना किमान रोजीरोटी तरी मिळेल. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत तरी नसेल, हा उद्देश समाज जगविण्याचा असला, तरी त्याच समाजात कोरोनाला रोखणे अशक्‍यप्राय होत असल्याने, हा उपाय किती लागू पडेल, हे काळच ठरविणार आहे. अशा द्विधा मनःस्थितीत अनेक कुटुंबे सध्या वावरत आहेत. कोरोनाला घाबरू नका, असे वरवर म्हणत असले, तरी प्रत्यक्षात बोलणारे कोरोनापासून चार हात दूर राहणे पसंत करीत आहेत. ही एक अनामिक भिती समाजमनात ठासून भरलेली आहे. कोरोनाला घाबरावेच लागेल, परंतु जे अति घाबरलेले आहेत, त्यांना धीर द्यावा लागेल. ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांचे मनोधैर्य वाढवा. आपापल्या परिसरातील अशा लोकांची मने पॉझिटिव्ह ऊर्जा देवून हलके करायला हवेत. नकारात्मकता सोडून सकारात्मक विचार पेरणी करावी लागेल. 

भावनांचे आंदोलन नको 

एका रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून एका कोरोनाबाधिताने उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. असे विचार मनात येण्यासाठी तयार होणारी भावना कोणीतरी दडपण्याची गरज आहे. नातेवाईक, मित्रपरिवाराने संबंधितांना मानसिक आधार देण्याची गरज आहे. त्यातून सर्व जण लिलया बाहेर पडतात, हे सांगण्याची हीच वेळ आहे. "रिकामे मन हे भूताचे घर असते' या उक्तीप्रमाणे अशा लोकांशी संवादाने काही परिणाम होतो का, ते पाहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना धीर देण्यासाठी खास विचार करायला हवा. आपले जीवन अमूल्य आहे, ते जपलेच पाहिजे, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा प्रत्येकाने करायला हवी. त्यासाठी समाजाने साथ द्यायला हवी. 

भारतीय संस्कृतीची देणगी 

मानवता ही भारतीय संस्कृतीला मिळालेली सर्वात मोठी देणगी. सर्वधर्मिय ग्रंथांत मानवतेचीच शिकवण दिली आहे. ऋषी-मुनींनीही मानवता हाच खरा धर्म सांगितला. धर्माच्या आचरणावरच समाजाचा हा डोलारा उभा आहे. हेच काम आपल्याला करायचे आहे. कोरोनाचे संकट मोठे असले, तरी त्याला समोरे जाताना एकमेकांविषयी प्रेमभावना जागृत ठेवणे महत्त्वाचे आहे. कोरोनाने गरीब-श्रीमंत हे सर्व मापके दूर केली आहेत. तो कोणालाही होऊ शकतो.

सेलिब्रिटी, राजकारणी, सर्वसामान्य शेतकरीही त्यास बळी पडतो. त्यामुळे लहान-मोठा असा भेदभाव न करता, गरजूंना प्रत्येकाने मदत करायला हवी. कोविड सेंटर उभारणीसाठी अनेक संस्था पुढे आल्या. त्यात सुविधा देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी आवर्जुन पुढे हात करावा. गरीबांना रुग्णालयात उपचार घेणे खूपच अवघड होत आहे. शासनाच्या अनेक योजना कुचकामी ठरू पाहत आहेत. अशा वेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना आपापल्या पातळीवर करणे, हेच संयुक्तीक आहे.