
नेवासे पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सलाबतपुर (ता. नेवासे) शिवारात वस्तीवर राहणाऱ्या एकाला दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत काडतुसांसह जेरबंद केले.
नेवासे (अहमदनगर) : नेवासे पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सलाबतपुर (ता. नेवासे) शिवारात वस्तीवर राहणाऱ्या एकाला दोन गावठी कट्टे व अकरा जिवंत काडतुसांसह जेरबंद केले. याप्रकरणी नेवासे पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक संशयित आरोपी फरार झाला आहे.
विलास श्रीपत काळे (वय ६५, रा. सलाबतपुर, ता. नेवासे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुसरा आरोपी पाल्या विलास काळे हा मात्र फरार आहे. नेवासे पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत सलाबतपुर गावात काळे हा जिवंत काडतुसांसह गावठी कट्टे कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून नेवासे पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या पथकाने सलाबतपुर शिवारातील दिघी चौकाजवळील नजन वस्ती जवळ सापळा रचून आपल्या घरी जात असलेल्या विलास काळे याला पकडले व त्याची अंग झडती घेतली असता.
त्याच्याकमरेला एक व पँटच्या खिशात एक असे प्रत्येकी चाळीस हजार रुपये किमतीचे दोन गावठी व व साडेपाच हजार रुपये किंमतीचे अकरा जिवंत काडतुसे असे एकूण ८५ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी काळे याची कसून चौकशी केली असता त्याला हे कट्टे त्याचा मुलगा पाल्या काळे याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी विलास काळे याला अटक करून नेवासे पोलिसांत दोघा पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पाल्या हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
माहिती मिळण्यास विलंब
पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची माहिती लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी असते. मात्र नेवासे पोलिसांत गुन्हे सकाळी ते सायंकाळी या वेळात कधीही दाखल होवो. अधिकृत माहिती मात्र रात्री उशिरा मिळते असा अनुभव आहे. यात बदल व्हावा आधीच अपेक्षा प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
संपादन : अशोक मुरुमकर