esakal | नव्या महापालिका आयुक्तांना आव्हानांचे हारतुरे
sakal

बोलून बातमी शोधा

The new Municipal Commissioner has big challenges

शहरात महावितरण व भुयारी गटारीच्या कामांमुळे जुन्या शहरातील रस्ते खोदले गेले. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नगरकर रोज धुळीचा सामना करीत आहेत.

नव्या महापालिका आयुक्तांना आव्हानांचे हारतुरे

sakal_logo
By
अमित आवारी

नगर ः महापालिका आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्‍ती झाली आहेत. आज किंवा उद्या ते पदभार स्वीकारण्याची शक्‍यता आहे. त्यांचे हारतुरे देऊन स्वागत केले जाईल. परंतु त्यांच्यासमोर मागील 10 वर्षांपासूनच्या शहरातील प्रलंबित समस्यांचे मोठे आव्हान असेल. 

चाळीसगाव, सातारा अशा मोठ्या पालिकांत मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या गोरे यांची नगरविकास विभागाने नुकतीच नगर महापालिका आयुक्‍तपदी बढतीवर बदली केली. शहरात गेल्या 10 वर्षांपासून अनेक योजना प्रलंबित आहेत. शहरातील ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याला तिलांजली देत, महापालिकेच्या नगररचना विभागाने त्यांना मान्यता दिल्या. ही अतिक्रमणे काढून ओढ्या-नाल्याचे नैसर्गिक प्रवाह खुले करणे, शहरातील पथदिवे बंद आहेत.

हेही वाचा - एखाद्या बागेने पुनर्जन्म घेतल्याचं तुम्ही पाहिलंय

एलईडी बसविण्याचे स्वप्न निविदाप्रक्रियेत अडकले आहे. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, आदी मूलभूत नागरी प्रश्‍न सोडविणे, अशी अनेक आव्हाने गोरे यांच्यासमोर आहेत. 
अमृत योजनेतील भुयारी गटारीचे केवळ 35 टक्‍केच काम झाले आहे. ठेकेदाराला सतत मुदतवाढ देण्याचा विक्रम करूनही काम अर्धेही पूर्ण झालेले नाही.

शहरात महावितरण व भुयारी गटारीच्या कामांमुळे जुन्या शहरातील रस्ते खोदले गेले. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नगरकर रोज धुळीचा सामना करीत आहेत. महापालिकेने सुमारे आठ वर्षांपासून फेज-2 योजनेतून पाण्याच्या मोठ्या टाक्‍या बांधून ठेवल्या आहेत. त्यात आतापर्यंत पाणीच पोचलेले नाही. शहरातील पक्‍क्‍या अतिक्रमणांवर हातोडे घालून अरूंद गल्ली-बोळा प्रशस्त करणे, धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याचे कामही त्यांना करावे लागणार आहे. शहरातील सावेडी नाट्यगृह, बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, नेहरू मार्केट व रंगभूवनची समस्या सोडविण्याचे आव्हानही गोरे यांच्यासमोर असेल. 

सावेडी कचरा डेपोच्या आगीचा प्रश्‍न 
शहरातील सावेडी कचरा डेपो सध्या बंद आहे. मात्र, त्यास गेल्या अडीच वर्षांपासून सहा वेळा आग लागली. त्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्नही महापालिका प्रशासनाने केलेला नाही. मात्र, आग विझविण्याचा खर्च नेहमीच महापालिकेला करावा लागला. या आगीबाबत चौकशी समिती नेमण्याची गरज व्यक्‍त होत आहे. 

स्वच्छता सर्वेक्षणाचे आव्हान 
स्वच्छता सर्वेक्षण अभियानास एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या अभियानासाठी महापालिकेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या अभियानात नगरला "फाईव्ह स्टार' मानांकन मिळवून देण्याचे आव्हान गोरे यांच्यासमोर आहे.