esakal | डफावर पडता थाप, उडतोय जामखेडकरांचा थरकाप

बोलून बातमी शोधा

New venture of the municipality in Jamkhed for tax collection}

जामखेडमध्ये सध्या घरासमोर डफ वाजवला जातो. डफ वाजण्याच्या भीतीने काही लोकांनी भीती घेतली आहे.

डफावर पडता थाप, उडतोय जामखेडकरांचा थरकाप
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : तिजोरी भरलेली असली तरच विकासकामे करता येतात. मात्र, जामखेडच्या पालिकेत खडखडाट होता. कर थकवल्याने अधिकाऱ्यांनी वेगळाच फंडा वापरला आहे. 

नगरपालिका प्रशासनाने करवसुलीसाठी थकबाकीदाराच्या घरासमोर डफ वाजविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे इज्जतीचा पंचनामा टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आता स्वत:हून पालिकेत करभरणा करण्यास सुरवात केली आहे. 
मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणली. डुक्करमुक्तीसाठी त्यांनी राबविलेल्या अभियानानंतर त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जामखेडकरांना आला. पालिका हद्दीत व्यावसायिक व रहिवासी, अशी सुमारे सव्वाआठ कोटींच्या आसपास थकबाकी आहे.

हेही वाचा - षटकाराच्या बादशहाची अपघाताने काढली विकेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नागरिकांना काही महिने सवलत दिली. मात्र, सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावरही थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करीत होते. पालिका प्रशासनाने वारंवार सूचना करूनही कर जमा होत नसल्याने तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता. त्यातून नागरिकांना मूलभूत सेवा पुरविण्यात अडचणी येत होत्या. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर करता येत नव्हते. 

मुख्याधिकारी दंडवते यांनी करवसुलीची मोहीम हाती घेतली. जानेवारी- फेब्रुवारीत दंडवते वसुली पथकासह प्रत्यक्ष थकबाकीदारांपर्यंत पोचले. तसेच, आठ-नऊ वर्षांपासून कर न भरलेल्या व्यावसायिक गाळेधारकांना विनंती केली, नोटिसा बजावल्या. गाळे "सील' करण्यास सुरवात केल्यावर मात्र काही गाळेधारकांनी भाडे भरण्यास सुरवात केली. तरीही सर्वांनी पैसे भरले नाहीत. 

अखेर मार्च उजाडला. पालिकेने थकबाकीदारांची नावे फलकावर लावली; मात्र हेही प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर पालिकेने थकबाकीदारांच्या घरांसमोर "डफली बजावो' कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे इज्जतीचा पंचनामा टाळण्यासाठी थकबाकीदारांनी पालिकेच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली असून, करवसुलीला आता वेग आल्याचे दिसत आहे.