मुळा धरणात नवीन पाण्याचा श्रीगणेशा! 

विलास कुलकर्णी
Tuesday, 16 June 2020

यंदा सरासरीपेक्षा जास्त 102 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. धरण 25.89 टक्के भरलेले आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही धरण भरून नदीपात्रात पाणी जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ​

राहुरी : मुळा धरणात यंदाच्या हंगामातील पहिले नवीन पाणी आज दाखल झाले. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात हरिश्‍चंद्रगड, कोतूळ परिसरात काल (सोमवारी) पाऊस नव्हता. परंतु मुळा धरण परिसरात पडलेल्या पावसाने धरणात नवीन पाण्याचा श्रीगणेशा झाला.

आज (मंगळवारी) सकाळी 116 दशलक्ष घनफूट पाणी धरणात जमा झाले. यंदा सरासरीपेक्षा जास्त 102 टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. धरण 25.89 टक्के भरलेले आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही धरण भरून नदीपात्रात पाणी जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

हेही वाचा ः सावधान ः नगरमध्ये आहेत 12 इमारती

मुळा धरणामुळे राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील 85 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नगर जिल्ह्यातील या सर्वांत मोठ्या धरणावर लाखो शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. 

धरणाच्या पाण्यावर दक्षिण नगर जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते. पिण्याच्या पाणी योजना व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा यामुळे मुळा धरण दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी ठरले आहे. त्यामुळे "मुळा'तील पाण्याकडे सर्वांचे लक्ष असते. 

अवश्य वाचा ः तब्बल 57 गावातील पाणी दुषीत
 

आजच्या दिवशी धरणात मागील वर्षाच्या तुलनेत एक हजार 674 दशलक्ष घनफूट जास्त पाणीसाठा आहे. काल (मंगळवारी) राहुरी तालुक्‍यात सात्रळ महसूल मंडळ वगळता सर्वत्र मॉन्सूनच्या पावसाने जोरदार कामगिरी केली.

राहुरी शहरात तब्बल साडेचार इंच (106 मिलिमीटर.) पाऊस कोसळला. देवळाली प्रवरा (36 मिलिमीटर), ताहाराबाद (6 मिलिमीटर), वांबोरी (15 मिलिमीटर), ब्राह्मणी (71 मिलिमीटर), टाकळीमियॉं (48 मिलिमीटर) येथे पावसाने हजेरी लावली. मुळा धरण येथे 29 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
--- 
मुळा धरणसाठा (दशलक्ष घनफूट) 
क्षमता ः 26,000 
आजच्या दिवशी मागील वर्षी ः 5,057 
आजचा साठा ः 6,731 
अचल साठा ः 4,500 
उपयुक्त साठा ः 2,231 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New water starts in Mula dam!