लॉकडाउनमध्ये कर्तव्य घडले, दोन महिन्यांत बिघडले; निम्म्यावर जोडप्यांचे तुझं-माझं जमेना

सूर्यकांत वरकड
Tuesday, 5 January 2021

कारण, गेल्या चार महिन्यांत भरोसा सेलकडे 730 तक्रारी आल्या. पैकी 50 टक्के तक्रारी नवदाम्पत्यांच्या आहेत. शिवाय उच्चशिक्षितांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. 

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाले. विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम रद्द झाले. लॉकडाउनमधून शिथीलता दिल्यावर अनेकांनी घाई-गडबडीत मुला-मुलींचे विवाह उरकले खरे, पण कोणतीही चौकशी न करता, शहानिशा न करता केलेले विवाह आता औट घटकेचे ठरत आहेत.

कारण, गेल्या चार महिन्यांत भरोसा सेलकडे 730 तक्रारी आल्या. पैकी 50 टक्के तक्रारी नवदाम्पत्यांच्या आहेत. शिवाय उच्चशिक्षितांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. 

विवाहित महिला व पती-पत्नीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस दलाने "दिलासा सेल' सुरू केला होता. आता त्याचे नामकरण "भरोसा सेल' करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर लॉकडाउन झाले.

हेही वाचा - नियती किती क्रूर असते बघा...

सगळे व्यवहार ठप्प झाले. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होताच, शासनाने लॉकडाउनमधून शिथिलता देण्यास सुरवात केली. त्यानंतर अत्यंत कमी लोकांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम होऊ लागले. 
लॉकडाउन काळात अनेकांचे विवाह झाले. कमी खर्चात, कमी माणसांत अनेकांनी विवाह उरकले. कोणीही कौटुंबिक पार्श्‍वभूमीची चौकशी केली नाही. मुलगा काय करतो, त्याचे आई-वडील काय करतात, याबाबत विचारणा केली नाही.

केवळ घर चांगले, म्हणून अनेकांनी विवाह लावले. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत त्यांचा काडीमोड झाला. अशा नवविवाहित मुलींनी थेट भरोसा सेलकडे धाव घेतली आहे. भरोसा सेलकडे आलेल्या 730 पैकी 50 टक्के तक्रारी नवदाम्पत्यांच्याच आहेत. त्यातील 218 जणांमधील वाद समझोत्याने मिटले असून, त्यांच्या संसाराचा गाडा रूळावर आल्याची माहिती भरोसा सेलचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विनोद इंगोले यांनी दिली. 

तक्रारींची कारणे 
- मुलगा नोकरीला असल्याचे खोटे सांगितले 
- मुलगा व्यसनी निघाला 
- मुलगा भोळसर असून, त्यावर उपचार सुरू आहेत 
- आर्थिक परिस्थिती उत्तम; पण माणसे चांगली नाहीत 

 

  • विवाहाची कारणे 
  • कमी खर्चात लग्न 
  • मुलाला वडील नसणे 
  • नातेवाईकांनी मदत केल्याने 

उच्चशिक्षितांचे वाद चव्हाट्यावर 
पुण्या-मुंबईसारख्या शहरात आयटी कंपनीत काम करणारे उच्चशिक्षित लॉकडाउनमध्ये गावाकडे आले आणि घरूनच कामे करू लागले. आजही अनेक "वर्क टू होम' करीत आहेत. रोज एकत्र राहिल्याने, त्यांच्या कौटुंबिक तक्रारी वाढल्या, तर मोबाईलमुळे अनेक गुपिते उघडकीस झाली. अनेकांचा रोजगार गेल्याने आर्थिक चणचण भासल्याने कौटुंबिक वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महिना (2020) तक्रारी समझोता 
सप्टेंबर 194 50 
ऑक्‍टोबर 165 64 
नोव्हेंबर 156 45 
डिसेंबर 215 59 

विवाह जुळविताना आई-वडिलांनी संपूर्ण कौटुंबिक चौकशी करणे आवश्‍यक आहे. अल्प चौकशीअंती विवाह केल्यानंतर भविष्यात अशा दाम्पत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लॉकडाउननंतर भरोसा सेलकडे 50 टक्‍के तक्रारी नवविवाहितांच्या आहेत. त्यातील अनेकांचा समझोता घडवून आणला आहे. 
- पल्लवी उबरहंडे, पोलिस उपनिरीक्षक, भरोसा सेल 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newlyweds preparing for divorce