शिर्डीत जानेवारीपासून होणार नाईट लँडिंग, तळांचे काम अंतिम टप्प्यात

सतीश वैजापूरकर
Sunday, 6 December 2020

डीजीसीए (महानिदेशक भारतीय विमान प्राधिकरण) अधिकाऱ्यांची भेट देऊन मानांकन देणे बाकी आहे. रात्रीचे प्रवासभाडे कमी असल्याने अनेक जण रात्रीची फ्लाईट पसंत करतात.

शिर्डी ः नव्या वर्षात शिर्डी विमानळ "गुड न्यूज' देण्यास सज्ज होत आहे. येथील "नाईट लॅंडींग'चे महत्त्वाचे काम पूर्णत्वास गेले आहे. पाठोपाठ विमाने उभे करण्यासाठी आवश्‍यक तळांचे (बे) कामही अंतिम टप्प्यात आहे.

जानेवारीपासून रात्रीची हवाई सेवा सुरू करता येईल. तसेच येथे चार ऐवजी आठ विमाने उभी करता येतील. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी मुंबई विमानतळावर उतरणारी विमाने येथे उतरविता येतील. विमानतळाचे उत्पन्न वाढेल आणि परिसरातील गावांत रोजगाराच्या संधी वाढतील. 

"नाईट लॅंडींग' सुविधा नसल्याने शिर्डी विमानतळाचा विकास खुंटला होता. देशाच्या विविध महानगरांतून हवाई सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या उत्सुक होत्या. मात्र, या सुविधेअभावी रात्रीची सेवा सुरू होत नव्हती. आता हे काम पूर्ण झाले.

डीजीसीए (महानिदेशक भारतीय विमान प्राधिकरण) अधिकाऱ्यांची भेट देऊन मानांकन देणे बाकी आहे. रात्रीचे प्रवासभाडे कमी असल्याने अनेक जण रात्रीची फ्लाईट पसंत करतात. आता ही सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल. विमानांच्या फेऱ्यांत मोठी वाढ होईल, असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. 

विमाने उभी करण्यासाठी चार "बे' (तळ) आहेत. नव्याने आणखी चार "बे' बांधण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे एअरबस व बोईंग ही जादा आसनक्षमतेच्या विमानांची उड्डाणे सुलभ होतील. "ट्रॅफिक जॅम'चा प्रसंग ओढवणार नाही. एवढेच नाही, तर अडचणीच्या वेळी मुंबई येथून गोव्याकडे वळविली जाणारी विमाने तुलनेत जवळ असलेल्या या विमानतळावर उतरविता येतील. त्यातून विमानतळाला मोठे उत्पन्न मिळेल. 
साईमंदिर दर्शनासाठी खुले झाले.

इंडिगो विमान कंपनीने दिल्लीसाठी दिवसाआड हवाईसेवा सुरू केली. आता "स्पाईस जेट'ने येत्या गुरुवारपासून (ता.10) बंगळुरू, दिल्ली व हैदराबादसाठी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीने कर्मचारीवर्ग पुन्हा तैनात केला आहे. साईमंदिरातील भाविकांची गर्दी वाढेल, तसेच हवाई प्रवाशांची संख्यादेखील वाढेल. 

"नाईट लॅंडींग'साठी आवश्‍यक कामे पूर्ण झाली आहेत. डीजीसीएचे अधिकारी येथे भेट देऊन या सुविधेची पाहणी करतील. त्यांची परवानगी मिळाली, तर येथून रात्रीची सेवा सुरू होईल. पूर्वी येथे चार विमाने उभी राहत होती. आता आठ विमाने उभी राहू शकतील. हवाई सेवा व विमानतळाच्या विकासाच्या दृष्टीने या दोन्ही बाबी महत्त्वाच्या होत्या. 
- रोहित रेफाडे, एअरसाईड मॅनेजर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Night landing in Shirdi from January