nilavande sai darshanbari Inauguration in Shirdi today attention of district announcement of pm narendra modi
nilavande sai darshanbari Inauguration in Shirdi today attention of district announcement of pm narendra modiesakal

Shirdi News : आज शिर्डीत निळवंडे, साई दर्शनबारीचे लोकार्पण; पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेकडे जिल्ह्याचे लक्ष

शेतकरी महामेळाव्यात मोदी काय बोलतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष

शिर्डी : उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी टापूतील दीड लाख एकर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या निळवंडे धरणाचे लोकार्पण, साईबाबांच्या अद्ययावत दर्शनबारीचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या टर्मिनलचे भूमिपूजन गुरुवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त शेतकरी मेळावा होणार आहे. या महामेळाव्यात मोदी काय बोलतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या मेळाव्याचे संयोजक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते आरोग्य, रेल्वे, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाईल. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या मेळाव्यास उपस्थित राहतील.

निळवंडेच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा आता हिरवागार होणार आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनात तब्बल बावन्न वर्षांनंतर सुबत्तेची नवी पहाट उगवू पाहत आहे. या धरणास यापूर्वीच केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली. दोन्ही कालव्यांचे अस्तरीकरण आणि बंद पाइपलाइनद्वारे वितरिकांसाठी अद्याप एक हजार ४०० कोटी रुपयांची गरज आहे. मोदी यांच्या भेटीमुळे केंद्र सरकारकडून हा निधी मिळणे सुलभ होईल. ही त्यांच्या आजच्या शिर्डी भेटीची महत्त्वाची फलश्रूती असेल.

भौगोलिकदृष्ट्या शिर्डी विमानतळ हे देश-विदेशातील साईभक्त आणि उत्तर महाराष्ट्राची सर्वाधिक महत्त्वाचे विमानतळ आहे. यासाठी सुसज्ज टर्मिनल व अन्य कामांसाठी ८७६ कोटी रुपये आणि सुशोभीकरणासाठी अन्य सेवा सुविधांसाठी ४९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन होणार आहे. कार्गो टर्मिनल उभारले जाणार असल्याने नाशिक, औरंगाबाद आणि नगर औद्योगिक वसाहतींना त्याचा फायदा होईल.

साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्च करून साईभक्तांसाठी सुसज्ज दर्शनबारी उभारली. दहा हजार भाविकांची क्षमता असलेल्या दर्शनबारीत चहा पान, स्वच्छतागृह, आसन व्यवस्था, लाडू विक्री, उदी वितरण, कापडकोठी, बुक स्टाॅल, देणगी कक्ष, जिने, रॅम्प, लिफ्ट आदी व्यवस्था आहेत.

दिवसभरात एक लाखाहून अधिक भाविक या दर्शनबारीतून साईसमाधीच्या दर्शनासाठी जाऊ शकतील. साईसंस्थानने २१८ कोटी रुपये खर्च करून टोलेजंग शैक्षणिक संकुल उभारले आहे. भविष्यात सुधारणा करण्यात साईसंस्थानला यश आले, तर हे संकुल परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्र्वभूमीवर पाच हजार १०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. पोलिस दलातील सर्व वरिष्ठ प्रमुख अधिकारी हजर राहणार आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांचे या बंदोबस्तावर लक्ष आहे. नगर जिल्ह्यातील एक हजार ३०० कर्मचारी व जिल्ह्याबाहेरील तीन हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहेत.

त्यासोबतच तब्बल आठशे पोलिस अधिकारी पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था हाताळणार आहेत. अहमदनगर पोलिस, राज्य राखीव पोलिसांसह केंद्रीय तपास संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सभेच्या ठिकाणाची तपासणी करण्यात आली आहे. त्यासोबतच सभेच्या ठिकाणी गुन्हे शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्र्वानांकडून कसून तपासणी करण्यात आली आहे.

शिर्डीत २४ एकरांत मेळाव्याची तयारी

शेतकरी मेळाव्यासाठी शिर्डी विमानतळाजवळ २४ एकरात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मोदी विमानतळावरून साईदर्शनासाठी जातील. तेथे दर्शनबारीच्या उदघाटनानंतर हेलिकॉप्टरने जाऊन निळवंडे धरणाचे लोकार्पण करतील.

त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरने शिर्डी विमानतळावर येऊन तेथील टर्मिनलचे भूमिपूजन करतील. तेथून जवळच आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील, असे नियोजन गृहित धरून दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com