Nilesh Lanke
Nilesh Lankesakal

Nilesh Lanke: ‘‘ जो लढतो, तोच हीरो असतो आणि एक दिवस तो जिंकतोच!’’

Nilesh Lanke on Election results: ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा नीलेश लंके यांचा प्रवास आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.

- प्रकाश पाटील

ग्रामपंचायत सदस्य ते खासदार असा नीलेश लंके यांचा प्रवास आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणारेही कमी नाहीत. टीका, विरोध, मानापमान सहन करीत मात्र, हा योद्धा लढतोय. यानिमित्त अभिनेता गोविंदा यांचा एक डायलॉग आठवला, ते म्हणतात,‘‘ जो लढतो, तोच हीरो असतो आणि एक दिवस तो जिंकतोच!’’

कितीही महान, धनवान आणि ताकदवान असो त्याला घरी बसविण्याची ताकद मतदारांमध्ये आहे. गरीब, गर्भश्रीमंत, असो कोणाला इंग्रजी येवो न येवो कोणीही आमदार, खासदार होऊ शकतो. नीलेश लंकेंसारखा एक सामान्य माणूस खासदार होतो. बलाढ्य शक्तीविरोधात दंड थोपटतो अन् जिंकतो काय? ही लढाई नक्कीच सोपी नव्हती.

लंके हे एकेकाळी सामान्य कार्यकर्ते होते. पारनेर तालुक्यातील हंगेसारख्या छोट्या गावातून आलेला हा कार्यकर्ता एका शिक्षकाचा मुलगा. प्रारंभी शिवसेनेसारख्या पक्षात प्रवेश करतो. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच होतो.

एके दिवशी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. थेट विधानसभेचे तिकीट मिळवितो. आमदार होतो. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी असो दिव्यांग त्यांच्या पाठीशी उभे राहाणे हे आपले कर्तव्य मानतो आणि राज्यातील युवकांचे आयडॉल बनतो.

लंके राज्यात नेहमीच गाजत राहिले. ते आमदार होते. कशाला दिल्लीत जातील असे सांगणारे अनेक जण होते आणि ते खरे आहे. उलट आमदार म्हणून राज्यात राहाणे नेत्यांना आवडते. आमदारकीचा राजीनामा देऊन, तर नक्कीच नाही. त्यांनी केवळ विखे घराण्याला विरोध करण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढविली, असे ते स्वत:च सांगतात.

भाजपने विखेंऐवजी कोणालाही उमेदवारी द्यावी. मी लढणार नाही, अशी भूमिका घेतली. या भूमिकेवर ते ठाम राहिले. भाजपने विखेंनाच उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थाने शिवधनुष्य घेऊन लंके रणांगणात उतरले. प्रसंगी अजित पवारांची साथ सोडली. किंमत मोजण्याची तयारी ठेवली.

समजा लंकेंचा पराभव झाला असता आणि पुढे विधानसभेलाही यश आले नसते, तर लंकेंनी काय केले असते, हा प्रश्‍नही यानिमित्ताने पडतोच. पण, लंके यांच्यासारखा नेता असा विचार करणे शक्य नव्हते. परिणाम काय होतील याचा विचारच अशी माणसं करीत नसतात. रडायचं नाही, लढायचं ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण त्यांनी अंगीकारली असावी.

लंके हे अहमदनगर मतदारसंघातील १९ लाख लोकांसमोर गेले. विखेंऐवजी मला का निवडून द्यायचे, हे सांगत राहिले. विखेंच्या प्रत्येक प्रश्‍नाला जशास तसे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी सभा घेतली, तरी त्यांना जिंकता आले नाही.

Nilesh Lanke
Ahmednagar Lok Sabha Result 2024 : विजयाचा गुलाल उधळल्यानंतर निलेश लंके यांनी मानले आभार

वास्तविक नगर जिल्हा साखरसम्राटांचा आणि राजकीय नात्यागोत्यांचा म्हणून ओळखला जातो. घराणेशाहीची परंपरा जपणाऱ्या जिल्ह्यातील एखाद्या सम्राटाला आव्हान देऊन ताट मानेने उभे राहाणे तसे सोपेही नव्हते. मात्र, लंके यांनी ते करून दाखविले.

नगर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत हिमालयाच्या उंचीची माणसं होऊन गेली. सार्वजनिक जीवनात ही माणसं नेहमीच सामान्याचा विचार करीत राहिली.लंके आता खासदार झाले आहेत. ते ही परंपरा आता पुढे चालवतील असा विश्र्वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com