काकणेवाडीच्या उपसरपंचाविरोधात अविश्‍वास ठराव दाखल; 28 रोजी विशेष सभा

सनी सोनावळे
Wednesday, 23 September 2020

काकणेवाडी (ता. पारनेर) उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सातपैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) अविश्‍वास ठराव दाखल केला.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : काकणेवाडी (ता. पारनेर) उपसरपंच बाळासाहेब भानुदास पवार यांच्याविरोधात सातपैकी पाच सदस्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे मंगळवारी (ता. २२) अविश्‍वास ठराव दाखल केला.

अविश्‍वास ठराव दाखल करताना बाळासाहेब नामदेव वाळूंज, प्रतिभा भिकाजी वाळूंज, कमल पोपट वाळूंज, कल्याणी गोरक्ष वाळूंज व शशीकांत शिवाजी वाळूंज हे सदस्य तहसिलदार ज्योती देवरे यांच्यासमोर उपस्थित होते. 

शहानिशा करण्यात आल्यानंतर उपसरपंच बाळासाहेब पवार यांच्याविरोधातील अविश्‍वास ठरावाचा प्रस्ताव तहसिलदार देवरे यांनी स्विकारला. आता नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी 28 सप्टेबरला ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली आहे.

उपसरपंच विश्‍वासात न घेता परस्पर निर्णय घेतात, विकास कामांच्या बाबतीत विचारात न घेता निर्णय घेतले जातात. विकास कामांचा हिशेब दिला जात नाही ही कारणे देत सदस्यांनी तहसिलदारांकडे अविश्‍वासाचा ठराव दाखल केला. आदीका गिताराम वाळूंज या काकणेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच असून उर्वरीत सदस्य त्यांच्या विरोधातील आहेत. सात सदस्यांमध्ये बेबनाव झाल्याने त्यांनी उपसरपंच पवार यांच्यावर अविश्‍वास आणल्याचे सांगितले जात आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No confidence motion filed against Kakanewadi Upsarpanch