नगर तालुक्यात बिनविरोधचा बार फुसकाच

दत्ता इंगळे
Monday, 4 January 2021

या प्रयत्नांमध्ये फक्त वारूळवाडी (ता. नगर) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले असून, इतर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यात नेतेमंडळी अपयशी ठरली आहे. 

नगर तालुका ः जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील मंत्र्यांसह विद्यमान आमदार, माजी आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

या प्रयत्नांना इतर तालुक्‍यांमध्ये चांगले यश आले असले, तरी वारूळवाडी, दशमी गव्हाण व अकोळनेर (ता. नगर) या तीन ग्रामपंचायती वगळता, तालुक्‍यातील अन्य ग्रामपंचायतींचा "बिनविरोध'चा फुसका बार ठरला आहे. 

ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आमदार, खासदार व माजी आमदारांसह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. तसेच प्रयत्न नगर तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींमध्येही तालुक्‍यासह पारनेर, राहुरी, श्रीगोंदे तालुक्‍यातील नेत्यांनीही प्रयत्न केले.

या प्रयत्नांमध्ये फक्त वारूळवाडी (ता. नगर) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले असून, इतर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यात नेतेमंडळी अपयशी ठरली आहे. 

नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यासाठी फक्त आमदार नीलेश लंके व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीच प्रयत्न केले. यामध्ये लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या नगर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर सर्वाधिक भर देऊन बैठका घेतल्या.

तसेच, कर्डिले यांनी जेऊर व नागरदेवळे जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना वारूळवाडी, दशमी गव्हाण व अकोळनेर वगळता अन्य ग्रामपंचायतींमध्ये यश आले नाही. 

हेही वाचा - रोहित पवारांच्या हाकेला दहा ग्रामपंचायतींची ओ

श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्‍यातील एकाही गावात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न न झाल्याने, कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

"त्या' बैठका निरर्थक 

नगर तालुक्‍यातील सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटनेसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, स्थानिक नेत्यांनी निवडणुका बिनविरोध होण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार व मंडळांच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मॅरेथॉन बैठका निरर्थक ठरल्याचीच चर्चा आज रंगली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No response to unopposed gram panchayat in Nagar taluka