जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार...दिवसात ३४१

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नगर तालुक्‍यातील सारोळा कासार, सोनेवाडी, अकोळनेर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. तपासणीही रॅपिड झाल्याने रुग्णसंख्येतही वेगाने वाढत आहे. शंभरावर आकडेही नित्याचेच झाले आहे. आज दिवसभरात आणखी 341 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 2027 झाली आहे. नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनाचा धोका आणखीनच वाढण्याची शक्‍यती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नेवासे तालुक्‍यातील सलाबतपूर येथे चार जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या शिवाय नगर शहर दोन, कर्जत शहर, वडगाव (शेवगाव), घुलेवाडी (संगमनेर) व नगर तालुक्‍यातील रुईछत्तीसी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह आढळून आला. 

खासगी प्रयोगशाळेतून रात्री प्राप्त झालेल्या अहवालात 173 जणांना बाधा झाली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना गेल्या तीन दिवसांपासून सुरवात केली आहे.

हेही वाचा - त्याला बायकोसोबत पाहिलं अन नवऱ्याने केलं असं

आतापर्यंत 1095 चाचण्या घेण्यात आल्या आहे. त्यात 158 जण बाधित आढळले. सध्या 854 जणांवर उपचार सुरू आहे. 

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून 158 रुग्णांची आज भर पडली. जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, कॅन्टोन्मेंट आणि महापालिका आरोग्य यंत्रणेला अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले. 

सारोळा, सोनेवाडी, अकोळनेर कंटेन्मेंट झोन 
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नगर तालुक्‍यातील सारोळा कासार, सोनेवाडी, अकोळनेर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला. हे आदेश तालुका दंडाधिकारी उमेश पाटील यांनी जारी केले. कंटेन्मेंट झोनमधील गावांत अत्यावश्‍यक सेवा, तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर पडण्यास मनाई आहे. हे आदेश एक ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 
 
आणखी 111 जण कोरोनामुक्त 
जिल्ह्यातील आणखी 111 जणांनी कोरोनावर मात मिळवली. त्यात नगर शहर 37, संगमनेर 32, पाथर्डी 14, अकोले सात, नेवासे पाच, राहाता, राहुरी प्रत्येकी चार, पारनेर तीन, भिंगार दोन, नगर तालुका, श्रीगोंदे, कर्जत येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1136वर पोचली आहे. 
 
कोरोना मीटर 
13342 व्यक्तींची तपासणी 
1845 पॉझिटिव्ह 
8459 निगेटिव्ह 
664 निरीक्षणाखाली 
815 होम क्वारंटाईन 
730 अहवाल येणे बाकी 
1136 रुग्णांना डिस्चार्ज 
40 जणांचा मृत्यू 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona in the district is two thousand