esakal | फसवणुकीच्या तक्रारीने सावेडी, नागापूर मंडलाचे भाऊसाहेब फरार

बोलून बातमी शोधा

Officers from Sawedi, Nagpur Circle are absconding

नागरिक आपल्या कामानिमित्त या कार्यालयात गेल्यास, तलाठी रजेवर असल्याचे सांगितले जात होते.

फसवणुकीच्या तक्रारीने सावेडी, नागापूर मंडलाचे भाऊसाहेब फरार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका ः शहराचे सर्वांत मोठे उपनगर असलेल्या सावेडी व नागापूरचे तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महसूल विभागाचे तीनही अधिकारी अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

ते कार्यालयात नसल्याने गायब झाले आहेत. त्यामुळे कार्यालय बंद आहेत. परिणामी सावेडीतील नागरिकांची गैरसोय होत आहे.  

अशोक मवाळ, पंकज मवाळ, भरत मवाळ, मृदुल मवाळ यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सावेडी शाखेतून मालमत्ता तारण ठेवून पाच कोटींचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्याचा बॅंकेचा बनावट दाखल तयार केला होता. हा दाखला सावेडीचे तलाठी हरिश्‍चंद्र देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप तरटे यांना देऊन मालमत्तेवरील कर्जाचा बोजा कमी केला होता. मंडलाधिकारी जगन्नाथ धसाळ यांनी ही नोंद मंजूरही केली होती. 

बॅंकेचे व्यवस्थापक सागर दुबे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात 25 मार्च 2021 रोजी कर्जदार मवाळ आणि सावेडी व नागापूरचे तलाठी, तसेच मंडलाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्नात होते. तेव्हापासून दोन्ही तलाठी कार्यालयांचे कामकाज ठप्प होते. पोलिस आपल्याला अटक करतील, या भीतीने या तीनही अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद केले.

नागरिक आपल्या कामासाठी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना मोबाईलवर संपर्क करीत होते. तीनही अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोनही काही काळ बंद केले होते. नागरिक आपल्या कामानिमित्त या कार्यालयात गेल्यास, तलाठी रजेवर असल्याचे सांगितले जात होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढलेला असतानाही अनेकांना आपली कामे मार्गी लावण्यासाठी या कार्यालयांत जावे लागत होते. मात्र, तेथे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत होता. 

 
तलाठी व मंडलाधिकाऱ्यांचा पदभार हस्तांतरित 
सावेडी व नागापूर विभागाचे तलाठी व मंडलाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचा पदभार अन्य तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मूळचा पदभार व अतिरिक्‍त पदभार असल्याने दोन्ही ठिकाणचे कामकाज पहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची काही काळ गैरसोय होत आहे. 
- उमेश पाटील, तहसीलदार, नगर