संगमनेरात अघटित...वृद्धाच्या मृत्यूनंतर रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह

An old man died of corona disease at Sangamnera
An old man died of corona disease at Sangamnera
Updated on

संगमनेर ः अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना संगमनेरमध्ये धक्कादायक घटना घडली. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली आहे.

आठ कोरोनाबाधीत रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा आनंद साजरा करणाऱ्या संगमनेरकरांना आज पुन्हा मोठा धक्का बसला. संगमनेर शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावरील धांदरफळ बुद्रुक येथील एका 68 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज रात्री 12 वाजता हॉटस्पॉटची बंधने सैल होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिल्याने, संगमनेरकर भलतेच आनंदले होते. कोरोनामुक्त शहरात पुन्हा भरारी मारण्यासाठी आतुरले होते. मात्र, शहरातील एका नामांकित रुग्णालयात मंगळवार ( ता. 05 ) रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा संशय आल्याने, त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने संबंधित रुग्णालयातून तपासणीसाठी मुंबईच्या खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

मृत्यूनंतर आला रिपोर्ट

आज त्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच सकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. तर दुपारनंतर प्राप्त झालेल्या अहवालात ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाला हादरा बसला आहे. या व्यक्तीच्या रुपाने संगमनेरात कोरोनाचा पहिला बळी गेल्याची चर्चा रंगली आहे.

शहरातील रुग्णालयात दाखल झालेल्या या व्यक्तीच्या लक्षणांवरुन संशय आल्याने डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पाठवून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेतले होते. मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या त्या स्त्रावाचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला. दरम्यान त्या रुग्णाला घरी नेले होते. 

प्रशासन झाले अलर्ट

आज सकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने तातडीने अहवाल मागवला. त्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने प्रशासन पु्न्हा अलर्ट झाले आहे. या व्यक्तीवर सर्व निकषांप्रमाणे धांदरफळमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र, मृत्यूनंतरही त्यांच्या घशातील स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

संपर्कातील लोकांची घेतली माहिती

तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा खुलासा करता येईल. तो पर्यंत त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचे काम सुरु झाल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

डॉक्टरलाच केले क्वॉरंटाइन  

रुग्ण दाखल असलेल्या शहरातील त्या नामांकित डॉक्टरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली अाहे. पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com