
तालुक्यातील ग्रामीण भागात साठविलेला जुना कांदा आता केवळ पाच टक्केच शिल्लक आहे. ठराविक कांदाउत्पादकांनी दरवाढीची अपेक्षा ठेवून, अनेक महिने तो साठवून ठेवला.
श्रीरामपूर ः कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जुना कांदाही विक्रीस आणीत आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. येथील बाजार समितीच्या कांदालिलावात शुक्रवारी (ता. 18) जुन्या कांद्याच्या दरात एक हजाराने घसरण झाली. स्थानिक बाजारासह नाशिक, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातून नवीन कांद्याची आवक सुरू असल्याने, जुन्या कांद्याच्या दरात सलग घसरण सुरू आहे. बाजारात ग्राहकांनी नवीन कांद्याच्या खरेदीला पसंती दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागात साठविलेला जुना कांदा आता केवळ पाच टक्केच शिल्लक आहे. ठराविक कांदाउत्पादकांनी दरवाढीची अपेक्षा ठेवून, अनेक महिने तो साठवून ठेवला. मात्र, नवीन कांदा बाजारात दाखल झाल्याने दर घसरले. त्यामुळे जुन्या कांद्याची विक्री करणे गरजेचे आहे.
हेही वाचा - आमदार लंकेंचे अण्णांनी केले कौतुक
येथील कांद्याला शुक्रवारच्या (ता. 18) लिलावात एक हजार ते एक हजार 800 रुपये दर मिळाला. त्यामुळे सलग दोन दिवसांत एक हजार ते 1200 रुपयांनी जुन्या कांद्याच्या दरात घसरण झाली. परिणामी, कांदा दरवाढीच्या प्रतीक्षेतील उत्पादकांना फटका बसला. पुढील काळात नवीन कांद्याची आवक वाढल्यावर जुन्या कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता किशोर कालंगडे यांनी वर्तविली.
नवीन कांद्याची आवक आणि दराचे चढ-उतार पाहून जुन्या कांद्याचा व्यापार होणार आहे. शुक्रवारच्या (ता. 18) येथील लिलावात जुन्या कांद्याला एक हजार ते एक हजार 800 रुपये दर मिळाला. नवीन कांद्याला एक हजार ते दोन हजार 100 रुपये दर मिळाला.
दरम्यान, शुक्रवारच्या लिलावात पाच हजार 396 कांदागोण्यांची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून कांदालिलावात सहा ते सात हजार गोण्यांची आवक होते. नगर आणि नाशिक भागातील व्यापारी कांदा खरेदी करतात.
सध्या नगरसह घोडेगाव (ता. नेवासे) येथील कांदालिलावात नवीन कांद्याची आवक सुरू आहे. त्याचा परिणाम जुन्या कांद्याच्या दरावर झाल्याचे दिसते.