आमदार लंके यांचा बिनविरोध ग्रामपंचायतचा निर्णय एका गावापुरता मर्यादीत नाही : अण्णा हजारे

MLA Lanka unopposed Grampanchayat decision is not limited to one village
MLA Lanka unopposed Grampanchayat decision is not limited to one village

राळेगण सिद्धी (अहमदनगर) : महात्मा गांधी म्हणत होते देश बदलायचा असेल तर आधी गाव बदलले पाहिजे. परंतु, खेड्यांचा विकास हा राजकिय गट- तट, निवडणुकांमधील मतभेदांमुळे रखडला.

आमदार निलेश लंके यांचा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय हा एका गावापुरता मर्यादित नाही. तर हा निर्णय राज्य व देशाला दिशा देणारा असून त्यामुळे लोकशाही मजबूत होईल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केला.

येथील ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होण्यासाठी राळेगणसिद्धी येथे शनिवारी (ता. १९) हजारे व आमदार निलेश लंके यांच्या उपस्थित ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी हजारे बोलत होते. शुक्रवारी सुपा येथे बैठकीत राळेगणसिद्धीचे कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची भुमिका घेत आमदार लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.  हजारे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हेही वाचा : गावकी हाकण्यासाठी पुढाऱ्यांचा कस; ग्रामपंचायतीत कोणाला द्यायची संधी?
हजारे म्हणाले, गावाच्या विकासासाठी संकुचित विचार न करता सर्वांनी दुरदृष्टी ठेवली पाहिजे. ग्रामपंचायत निवडणुकांत झालेल्या मतभेदाचे लोन पाच वर्षे चालु राहतात. त्याचा गावाच्या एकूण ग्रामविकासावर परिणाम होतो. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे देशात जात, पात, वंश यांच्यात द्वेष वाढत आहे. शेजा-यांत मतभेद - मारामा-या होतात. निवडणुकातुन वाढत असलेली द्वेष भावना देशाला हितकारक नाही. राजकिय पार्ट्यांत मतभेद, द्वेष वाढतात हा देशाला मोठा धोका आहे. आमदार लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याची घेतलेली भुमिका निश्चित स्वागतार्ह आहे. त्यातून राज्य व देशाला चांगली दिशा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार लंके म्हणाले, पारनेर मतदार संघ हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा मतदार संघ आहे. मी आमदार असलो तरी जनसेवक आहे. काल सुपा गटातील ३० ग्रामपंचायतीतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यापैकी १३ गावात बिनविरोध निवडणुका होऊ शकतील. आज टाकळीढोकेश्वर गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याची सुरूवात राळेगणसिद्धीतून झाल्याचा आनंद वाटतो. यावेळी लंके यांनी ज्या ग्रामपंचायतीशी चर्चा झाली आहे त्याचा आढावा हजारे यांना दिला.

ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध होत असल्याने निवडणुक खर्चात वाचलेला पैसा गरिब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्याचे आवाहन माजी उपसरपंच लाभेश औटी यांनी केले. औटी यांनी स्वतः ५० हजार रूपये त्यासाठी देणार असल्याचे जाहिर केले. हजारे यांच्या संकल्पनेतून लवकरच त्यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असल्याचे औटी म्हणाले. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगणसिद्धीचा विकास झाला. त्यांच्या विचारांना साजेसे काम एकोप्याने व्हावे यासाठी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णयाला आपण पाठिंबा दिल्याचे सरपंच जयसिंग मापारी व उद्योजक सुरेश पठारे यांनी भाषणात सांगीतले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या वेळी माजी सरपंच सदाशिव मापारी, शरद मापारी, दादा पठारे, दत्ता आवारी, गणेश हजारे, किसन मापारी, रोहिदास पठारे, भाऊ गाजरे, दादा गाजरे, गिताराम औटी, रामहरी भोसले, विजया पठारे, विजय पोटे,अनिल उगले, रूपेश फटांगडे, माजी उपसपंच सुरेश पठारे, दादा पठारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाही स्विकारली तर निवडणुक करणे हा दोष नाही. पण निवडणुकांत कार्यकर्ते सत्ता- पैसा यात अडकल्याने दोष तयार होतात. राळेगणसिद्धी परिवारात मागील ५० वर्षांत दोन- तीन अपवाद वगळता ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे ख-या अर्थाने ग्रामस्थांच्या एकजूटीतून राळेगणसिद्धीचा ग्रामविकास झाला. आमदार लंके यांच्या पारनेर मतदार संघातील ग्रामंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या भुमिकेचा आपण गावागावात प्रचार करणार आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

गावपातळीवर विकासाला चालना मिळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याची आपली भुमिका आहे. जे गाव बिनविरोध निवडणुक करून मतभेद संपतील व  तेथे विकासाला नक्कीच चालना मिळेल. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून आमदार फंड व इतर हेड खालील २५ लाखाचा निधी त्या गावाला आपण देणार आहोत. पारनेर मतदार संघातील निवडणुका होऊ घातलेल्या ११० ग्रामपंचायतींपैकी ५० ते ५५ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात मला नक्की यश मिळेल, असे आमदार निलेश लंके म्हणाले.

असा ठरला फॉर्म्युला
सुपा येथे झालेल्या बैठकीतच राळेगणसिद्धीची निवडणुक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्यात ९ जागांपैकी माजी उपसरपंच लाभेष औटी यांच्या गटाला ४ जागा व अगोदर दोन वर्षे सरपंचपद तर माजी सरपंच जयसिंग मापारी यांच्या गटाला ५ जागा  व नंतर तीन वर्षे सरपंचपद देण्यावर एकमत झाले. उपसरपंच पद ज्या गटाचा सरपंच असेल त्यावेळी ते दुसऱ्या गटाकडे असेल यावर एकमत झाले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com