श्रीरामपूरमध्ये दीड हजार जणांना मिळणार कोरोना लस, प्रशासनाची तयारी पूर्ण

गौरव साळुंके
Sunday, 20 December 2020

प्रथम टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या आणि खाजगी डॉक्टरांना लस दिली जाणार आहे.

श्रीरामपूर ः कोरोनावरील लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. लसीकरणासाठी विशेष कृतीदल स्थापन करण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी डॉक्टरांसह आरोग्य विभागातील एक हजार 414 कर्मचाऱ्यांना प्रथम टप्प्यात लसीकरण केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.

या संदर्भात प्रांताधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृती दल स्थापन केले असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे समन्वयक साधणार आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील विविध संघटनेचा कृती दलात समावेश आहे.

हेही वाचा -  जामखेडला हजर होताच पोलिस निरीक्षकांनी दाखवला हिसका

प्रथम टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या आणि खाजगी डॉक्टरांना लस दिली जाणार आहे. तालुका आरोग्य विभागातील, बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील, खाजगी आरोग्य सेवा, पढेगाव आरोग्य केंद्र, टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्र, उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, निमगावखैरी प्राथमिक आरोग्य केंद्र, माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका ग्रामीण रुग्णालय आणि कोरोना केअर केंद्रातील एक हजार 414 नागरीकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे.

लस आल्यानंतर एका विशिष्ट तापमानात ठेवावी लागेल. त्यासाठी आरोग्य विभागाचे नियोजन सुरु आहे. तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस साठवण्याची व्यवस्था केली जात आहे.

संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात
संत गाडगेबाबा यांनी समाजातील अंधश्रद्धांचे निर्मूलन केले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर जनजागृतीचे कार्य केले. अनिष्ट प्रथा आणि परंपरांना त्यांचा विरोध होता. तसेच समाजातील गोरगरीबांनी शिक्षण घेऊन डोळस व्हावे असा त्याचा आग्रह होता.

गाव आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर पायपीट करून प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केल्याचे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. येथील लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आज अशोकनगर येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी माजी आमदार मुरकुटे यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी अशोक कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, उपाध्यक्ष पोपट जाधव, माजी अध्यक्ष सोपान राऊत, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कार्यालय अधिक्षक आप्पासाहेब दुशिंग, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कारेगाव भाग कंपनीचे मानद कार्यकारी संचालक नानासाहेब लेलकर, निलेश गाडे, रमेश आढाव उपस्थित होते.

बेलापूरात संत गाडगेबाबांना अभिवादन
तालुक्यातील बेलापूर येथील संत गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. बेलापूर येथील विजयस्तंभ चौकात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच रवी खटोड, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, व्यापारी संघटनेचे प्रशांत लड्डा, यादव काळे, रंजना बोरुडे, कांताबाई राऊत, अशोक गवते, अनिल पवार उपस्थित होते.
...............
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half thousand people will get corona vaccine in Shrirampur