राहुरीत अनोळखी इसमाची गळफास घेऊन आत्महत्या, लटकलेला मृतदेहच काढता येईना

विलास कुलकर्णी
Tuesday, 8 September 2020

घटनास्थळ ओढ्याच्या कडेला आहे. ओढ्याला पाणी व गाळ आहे. काल सायंकाळी जेसीबी घटनास्थळी आणण्यात आला. परंतु, चालकाने मशीन गाळात फसण्याच्या भीतीने, जेसीबी ओढ्यात घातला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्नांची शिकस्त केली.

राहुरी : कणगर हद्दीत ओढ्याच्या कडेला असलेल्या शेत जमिनीतील लिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाने नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल (सोमवारी) दुपारी दोन वाजता घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परंतु, मृत इसमाचा गळफास काढला नाही. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत प्रेत झाडाला लटकलेले होते.  

रामचंद्र भाऊ नरोडे (रा. चिंचविहिरे) यांच्या मालकीच्या कणगर हद्दीतील शेतजमिनीत असलेल्या लिंबाच्या झाडाला पस्तीस वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काल दुपारी जनावरांना गवत आणण्यासाठी गेलेले योगेश प्रकाश नरोडे (रा. चिंचविहिरे) यांनी घटनास्थळी आत्महत्येचा प्रकार पाहिला.

कणगरचे पोलीस पाटील चंद्रभान मुसमाडे यांनी राहुरी पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपवून मोकळे झाले. 

हेही वाचा - बेफिकीर संगमनेरकर, दोन हजारांवर गेला बाधितांचा आकडा

घटनास्थळ ओढ्याच्या कडेला आहे. ओढ्याला पाणी व गाळ आहे. काल सायंकाळी जेसीबी घटनास्थळी आणण्यात आला. परंतु, चालकाने मशीन गाळात फसण्याच्या भीतीने, जेसीबी ओढ्यात घातला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्याने प्रयत्नांची शिकस्त केली. त्यांना पोलीस ठाण्याची साथ नसल्याने, एकट्याचे प्रयत्न तोकडे पडले. 

आज सकाळी दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून जागेवर उत्तरीय तपासणी करण्याचे ठरले. तेथेच मृतदेहाला मूठमाती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. परंतु, शेतमालक व ग्रामस्थांनी अनोळखी इसमाला खासगी शेतात मूठमाती देण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिसांसमोर पेचप्रसंग उभा ठाकला. अखेर कणगर ग्रामपंचायतीवर मृतदेहाला मूठमाती देण्याची व्यवस्था सोपविण्यात आली. 

 

कणगर हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केलेला इसम अनोळखी आहे. चार दिवसांपूर्वी गळफास घेतला असावा. मृतदेह कुजलेला आहे. काल (सोमवारी) मृतदेह खाली उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, घटनास्थळ अडचणीचे असल्याने शक्य झाले नाही. आज (मंगळवारी) दुपारी घटनास्थळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून, मूठमाती दिली जाईल.

- दिनेश आव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल, राहुरी.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One commits suicide by strangulation in Rahuri