सावरगाव तळ ठरले राज्यातील पहिलेच गाव, शंभर टक्के ई पीकनोंदणी

आनंद गायकवाड
Thursday, 17 September 2020

याचबरोबर, विविध शासकीय योजना, शेतकऱ्यांना पिकास योग्य हमी भाव, बॅंक पतपुरवठा, पीकविमा संरक्षण, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई, पिकांच्या नुकसानीला शासकीय अनुदान आदी बाबींसाठी या पीकनोंदणीचा मोठा फायदा होणार आहे.

संगमनेर ः सरकार आणि टाटा ट्रस्टतर्फे राज्यात मागील वर्षीच्या रब्बी हंगामापासून, महसूल विभागांतर्गत ई-पीकपाहणी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर नऊ तालुक्‍यांत सुरू करण्यात आला.

या वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्‍यातील सावरगाव तळ या गावाने 815 हेक्‍टर क्षेत्रावर पीकनोंदणी करून 100 टक्के पीकनोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले. राज्यात ई-पीकनोंदणी करणारे पाहिले गाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या स्मार्ट फोनमध्ये ई-पीकपाहणी ऍपद्वारे आपल्या शेतातील उभ्या पिकांची नोंदणी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ई-पीकपाहणीमुळे शासनास प्रत्येक पिकाची, उत्पादनाची माहिती योग्य प्रकारे मिळू शकते. याचा फायदा योग्य शासकीय धोरण ठरविण्यासाठी होणार आहे.

याचबरोबर, विविध शासकीय योजना, शेतकऱ्यांना पिकास योग्य हमी भाव, बॅंक पतपुरवठा, पीकविमा संरक्षण, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई, पिकांच्या नुकसानीला शासकीय अनुदान आदी बाबींसाठी या पीकनोंदणीचा मोठा फायदा होणार आहे.

या योजनेत राज्यातील संगमनेर व दिंडोरी (नाशिक विभाग), बारामती (पुणे), वाडा (कोकण), फुलंब्री व सिल्लोड (औरंगाबाद), सेलू (परभणी), कामठी (नागपूर) व अचलपूर (अमरावती) या नऊ तालुक्‍यांचा समावेश होता. यात 10 लाख 17 हजार 389 शेतकऱ्यांचा समावेश होता. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred percent e-crop registration in Savargaon Tal village