पुणे- नाशिक महामार्गावर १० हजार लिटर तेल पसरले; टँकरला मागून धडक

शांताराम जाधव
Saturday, 17 October 2020

पुणे- नाशिक महामार्गावर नवीन माहुली एकल घाटात सोयाबीनचे कच्चे तेल घेवून जाणाऱ्या टँकरला मागून टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) पहाटे पाच वाजता घडली.

बोटा (अहमदनगर) : पुणे- नाशिक महामार्गावर नवीन माहुली एकल घाटात सोयाबीनचे कच्चे तेल घेवून जाणाऱ्या टँकरला मागून टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी (ता. १६) पहाटे पाच वाजता घडली. यामुळे महामार्गावर अंदाजे १० हजार लिटर तेल पसरले. या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मालवाहू टँकर धुळेहून सोयाबीनचे २० टन कच्चे तेल घेवून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने जात होता. हा टँकर नवीन माहुली एकल घाटात आला असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने मागून जोराची धडक दिली. यावेळी टँकरला दोन ठिकाणी मोठ्या चिरा पडून तेल महामार्गावर वाहू लागले. टेम्पोचा पुढचा भाग पूर्णपणे दबल्याने त्यात क्लिनर सापडला. दरम्यान महामार्गावरुन येणाऱ्या- जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून टेम्पोमध्ये अडकलेल्या क्लिनरला सुखरूपपणे बाहेर काढले. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान टँकरमधील तेल गळती सुरूच होती. जणू महामार्गावर तेलाचा सडाच पडला होता. शिवाय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गटारांमध्ये वाहत जाणारे तेल साचले होते. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तेल सांडलेल्या जागेवर मातीचा थर पसरविला. त्यामुळे पुढील अपघात टळले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One injured in tanker and tempo accident on Pune Nashik highway