esakal | बनावट रेमडेसिव्हिर विक्रीप्रकरणी एकाला अटक; रिकाम्या बाटल्यामध्ये सलाईन मधील पाणी भरुन विक्री

बोलून बातमी शोधा

One person has been arrested
बनावट रेमडेसिव्हिर विक्रीप्रकरणी एकाला अटक
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्यासह देशभरात कोरोनाचा दिवसेंदिवस कहर वाढत आहे. उपचारासाठी रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात येथील एका कोरोनाबाधितला तात्काळ रेमडेसिव्हीरची गरज असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्री केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकाला अटक केली.

रईस अब्दुल शेख (वय २०, रा. मातापुर, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने आरोपीला पुढील चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना तात्काळ रेमडेसिव्हीर मिळवून देतो. असे सांगून कोविड रुग्णालयातील डाॅक्टरांनी वापरुन कचरापेटीत फेकलेल्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यामध्ये सलाईन मधील पाणी भरुन रईस विक्री करीत होता. बनावट रेमडेसिव्हिर प्रकाराची माहिती मिळताच पोलिस पथकाने येथील नेवासे रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासमोरुन त्याला पकडले.

पोलिस ठाण्यात कसून चौकशी करुन बनावट रेमडेसिव्हिर विक्रीप्रकरणी रईस अब्दुल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपीने यापुर्वी किती बनावट इंजेक्शन कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना विकले. बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनमुळे कोणी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला का? याबाबत शहर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यात बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याचा शेख यांचा पहिला प्रयत्न असून २५ हजार रुपयांचा इंजेक्शन विक्री केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई अर्जुन पोकळे, पोलिस नाईक संजय दुधाडे, किरण पवार, शरद वांढेकर यांनी केली.