भाववाढीचा फुगा फुटला, कांद्याचे लिलाव अडखळले सहा हजारांच्या आतच

विनायक दरंदले
Monday, 2 November 2020

शेतकरी कांद्याचे भाव वाढतील म्हणून थोडा-थोडा कांदा घेवून येत आहे.या उन्हाळी कांदा आता खराब होवू लागल्याने आहे तो भाव पदरात पाडून घ्यावा. अशा मनस्थितीत शेतकरी आला आहे

सोनई: दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कांद्याने रिव्हर्स गिअर टाकला आहे. आज तर भाववाढीचा एकदम फुगाच फुटला.

नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात आज छत्तीस हजार कांदा गोण्यांची आवक होवून क्विटंलचा भाव सहा हजारतच अडखळला आहे.

मागील आठवड्यात प्रत्येक लिलावात कांद्याचा भाव एक ते तीन हजाराने कमी झाल्यानंतर आवक कमी होत गेली होती.केंद्र सरकारने कांदा आयात केल्याच्या बातम्या सोशलमिडीयावर फिरु लागल्याने भाव एकदम कमी होण्याच्या भितीने आज बाजारात
छत्तीस हजार २६६ कांदा गोण्यांची आवक झाली होती.

शेतकरी कांद्याचे भाव वाढतील म्हणून थोडा-थोडा कांदा घेवून येत आहे.या उन्हाळी कांदा आता खराब होवू लागल्याने आहे तो भाव पदरात पाडून घ्यावा. अशा मनस्थितीत शेतकरी आला आहे. सध्या काही व्यापारी व आडतदाराने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करुन साठा केला आहे.बाजारात नवीन लाल कांदा अजून तरी आलेला नाही.

आज एक नंबर कांद्यास पाच ते साडेसहा हजाराचा भाव मिळाला.दोन नंबर कांद्यास चार ते पाच हजार तर गोल्टी कांद्यास तीन ते साडेतीन हजार क्विटंलचा भाव मिळाला.काही मोजक्या गोण्यास सात हजाराचा भाव मिळाला.आज दिवसभरात नऊ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The onion auction stalled within six thousand