निर्यातबंदीनंतरही कांदा भाव खाणार

सतीश वैजापूरकर
Friday, 18 September 2020

तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या हाती हुकमाचा एक्का आहे. तथापि, मोठे नुकसान यापूर्वीच होऊन गेले. त्यामुळे विजय मिळवूनही शेतकऱ्यांच्या पदरात फार काही पडेल, अशी स्थिती नाही. 

शिर्डी ः निर्यातबंदी लादणारे केंद्र सरकार आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे चाळीतील कांदा सांभाळणारे कांदाउत्पादक यांच्यात अघोषित संघर्ष सुरू झाला आहे. त्यात शेतकऱ्यांच्या विजयाची शक्‍यता अधिक आहे.

निर्यातबंदी होताच, बाजार समित्यांच्या मोंढ्यावर कांद्याची आवक आज 60 ते 70 टक्‍क्‍यांनी घटली. ही घट अशीच राहिली, तर भाव पुन्हा उसळी घेईल. निर्यातबंदी उठवा किंवा उठवू नका; कांद्याचे भाव कमी करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सफल होणार नाही.

तुटवडा असल्याने शेतकऱ्यांच्या हाती हुकमाचा एक्का आहे. तथापि, मोठे नुकसान यापूर्वीच होऊन गेले. त्यामुळे विजय मिळवूनही शेतकऱ्यांच्या पदरात फार काही पडेल, अशी स्थिती नाही. 

जिल्ह्यात अनुभवी कांदाउत्पादकांच्या चाळींत 20 ते 25 टक्के कांदा शिल्लक आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. सलग शंभर ते सव्वाशे दिवस पावसाळी वातावरणामुळे चाळींतील कांदा मोठ्या प्रमाणात सडला. दोनदा पल्टी मारून तो निवडावा लागला.

काहींनी चाळींत पंखे लावले, तर काहींनी हॅलोजन दिवे लावून आर्द्रतेवर मात करण्यासाठी धडपड केली. त्यासाठी मोठा खर्च केला. एवढा मोठा खटाटोप करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रतिक्विंटल तीन ते चार हजार रुपये भावाची अपेक्षा केली तर त्यात गैर ते काय? 

निर्यातबंदीचा निर्णय जाहीर होताच 500 ते 700 रुपये क्विंटलने भाव खाली आले. मोठा खर्च करून कांदा सांभाळणारे उत्पादक निराश झाले. मात्र, आता त्यांनी गरजेपुरता कांदा विकण्याचे ठरविले. त्याचा परिणाम म्हणून आज राज्यात कांद्याची आवक 60 ते 70 टक्‍क्‍यांनी घटली. संपूर्ण देशाला सध्या केवळ महाराष्ट्रातूनच कांदा पुरविला जातो. नगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील कांदा दक्षिण भारतात जातो, तर नाशिकचा कांदा दिल्ली, पंजाब, उत्तराखंड व पूर्वांचलपर्यंत जातो. 

निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. निर्यातबंदी उठेल आणि 500-700 रुपये क्विंटलने दर वाढतील, अशी त्यांची अपेक्षा आहे. निर्यातबंदी उठविली नाही आणि तुटवडा निर्माण झाला तरी दर वाढतील, याचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच कालपासून राज्यात सर्वत्र आवक घटली.

कांदाउत्पादन कमी आणि नुकसान अधिक झाले आहे. चार हजार रुपये क्विंटल भाव मिळाला, तरी नुकसान लक्षात घेता, फार पैसे त्यातून मिळतील अशी स्थिती नाही. त्यात निर्यातबंदी करून केंद्र सरकारने उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना उत्पादकांच्या मनात आहे. 

कर्नाटकातून लाल कांद्याची आवक होईल, ही अपेक्षा यंदा ठेवता येणार नाही. तेथे अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट येणार आहे. निर्यातबंदीला दुसरी बाजूही आहे. साडेसहाशे डॉलर क्विंटलने आपला कांदा बाहेर कोण घेईल? कोविडमुळे कांद्याच्या जागतिक बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे. कांदा बियाण्याचा भाव चार हजार रुपये किलो झाला. एकरी अडीच किलो बियाणे लागते. पावसाळा लांबत चालला. त्यामुळे शेतकरी लाल कांदा पेरण्याची किंवा रोप टाकण्याची हिंमत करीत नाही. माल नाही, तुटवडा झाला, तर भाव वाढणारच, ही साधी गोष्ट आहे; मग तुम्ही निर्यातबंदी करा अथवा करू नका! 
- चांगदेव होळकर, माजी संचालक, नाफेड, निफाड, नाशिक 

कर्नाटकात अतिवृष्टी झाली हे खरे असले, तरी तेथे लाल कांद्याचे किती उत्पादन होईल, यावर बरेच अवलंबून आहे. संपूर्ण देशाला सध्या महाराष्ट्र कांदा पुरवतो. येथील बाजारपेठेत लाल कांदा यायला आणखी दोन महिने लागतील. तोपर्यंत उन्हाळी कांदा पुरेल; मात्र त्याचे प्रमाण कमी राहील. पुढे लाल कांदादेखील तुलनेत कमी राहील. उत्पादन मर्यादित असल्याने भाव टिकून राहतील, हे खरे आहे. मात्र, कांद्याबाबत भले भले ठाम भाकीत करू शकत नाहीत. 
- किरण दंडवते, कांदाव्यापारी, राहाता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices will continue to rise even after the export ban