कांद्याचा रिव्हर्स गिअर, शेतकऱ्यांत संताप

विनायक दरंदले
Sunday, 25 October 2020

उपबाजारात आज 34 हजार 765 कांदागोण्यांची आवक झाली. त्यात काही गोण्यांना आठ हजार रुपये भाव मिळाला.

सोनई : आठवड्याच्या सुरवातीला 12 हजार रुपये क्विंटलवर गेलेला कांद्याचा भाव आता आठ हजारांच्या आसपास रेंगाळला आहे. अडत्यांचा एकदाच भाव वाढवून आवक वाढविण्याचा फंडा चक्रावून टाकणारा ठरत आहे. 

नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात सोमवारी (ता. 19) क्रमांक एकच्या कांद्यास 12 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता. या भावाने थोडा-फार कांदा जाताच सोशल मीडियावर त्याचा डंका पिटण्यात आला.

परिणामी, बुधवारी (ता. 21) येथे दुपटीने आवक झाली. या आणि आजच्या लिलावातही कांद्याचा भाव आठ हजारांच्या साडेसातीत अडकला. अडते व व्यापारी आकर्षित करून एक प्रकारे फसवणूक करीत असल्याचा सूर शेतकऱ्यांनी लावला होता. 

उपबाजारात आज 34 हजार 765 कांदागोण्यांची आवक झाली. त्यात काही गोण्यांना आठ हजार रुपये भाव मिळाला. मोठ्या कांद्याला साडेपाच ते सात हजारांचा भाव मिळाला. मध्यम कांदा चार ते साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने गेला. आजच्या लिलावात 9 कोटी 38 लाखांची उलाढाल झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion reverse gear, anger among farmers