शाडू मातीपासून गणेश मृर्ती बनवण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण

सनी सोनावळे
Wednesday, 19 August 2020

रासायनिक रंग प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली पाहिजे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : रासायनिक रंग प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी शाडु मातीद्वारे बनविण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीची विद्यार्थ्यांना ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साईटवरून माहिती दिली आहे.

कोरोना महामारीमुळे भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. शाळा ऑनलाइन सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देता येत नाही. शाळा प्रत्यक्ष सुरू असताना विविध माहितीद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे पर्यावरणाचे महत्त्व पर्यावरण पूरक गणेश उत्सव कसा साजरा करता येईल याविषयी समक्ष माहिती देता येत होती. परंतु आता ऑनलाइन किंवा सोशल मीडियाद्वारे हे प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे.

यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे गणेश मूर्ती घरीच शाडू मातीच्या साह्याने गणपती मुर्ती तयार केली. या मुर्तिची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. यामुळे घरीच मुर्ती तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला. यावर्षी घरी थांबून कलाशिक्षक कवडे यांनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी-पालक यांच्यापर्यंत शाडू मातीद्वारे गणेश मूर्ती कशी तयार करायची याविषयी माहिती दिली आहे.

शाडू मातीद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने गणेशाचे आकार तयार होतात. गणेश मूर्ती तयार होते. शाडू माती पाण्यामध्ये पटकन विरघळते. हे शाडू मातीचे वैशिष्ट्य आहे. या मूर्तीचे विसर्जन सुद्धा आम्ही घरीच करणार आहोत. विसर्जित झालेली माती ही आमच्या शेतात असलेल्या झाडाला टाकणार आहोत. अशा पद्धतीने हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन अभ्यासक्रम जोरात सुरू आहे. याच संस्थेच्या पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाखेत कवडे हे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online training on making Ganesh Mritti from shadu clay