भारताची महान संस्कृती वैश्‍विक पातळीवर नेण्याची संधी

आनंद गायकवाड
Monday, 14 December 2020

योगासनांना वैश्‍विक पातळीवर नेताना आपल्या महान संकृतीचा परिचय जगाला करुन देण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत.

संगमनेर (अहमदनगर) : आपली प्राचीन संस्कृती असलेल्या योगासनांना वैश्‍विक पातळीवर नेताना आपल्या महान संकृतीचा परिचय जगाला करुन देण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत.

या माध्यमातून देशातील मुलांचे शरीर आणि संकल्प पोलादी करण्याचे राष्ट्रकार्य आपल्या हातून घडणार असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष, योगमहर्षि स्वामी रामदेव यांनी केले. 

गेल्या महिन्यात आयुष मंत्रालयाकडून मान्यता मिळालेल्या नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने, संगमनेरात तीन दिवसीय योगासन परीक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे महासचिव डॉ. नागेंद्र यांनी योगासनांचा वैश्‍विक प्रसारासाठी को-ऑपरेशनचे तंत्र वापरण्याचा सल्ला देतांना, देशातील अबालवृद्धांना या प्रवाहात आणण्यासाठी स्पर्धांचे मोठे महत्त्व असल्याचे सांगीतले. जगातील असंख्य योगप्रेमी या मिशनमध्ये सहभागी होण्यास उत्सुक असून ही कार्यशाळा त्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल असे सांगितले.

फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. बसवशेट्टी यांनी आपले लक्ष्य स्वस्थ आणि सुंदर भारताचे असल्याचे सांगताना, योग हा जन्मतःच भारतीयांच्या अंगी असणारा उपजत गुण आहे. त्याला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाल्याने त्याचा वेगाने प्रचार आणि प्रसार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

देशभरातील फेडरेशन व असोसिएशन यांनी एकत्रित येवून आपली संस्कृती जगासमोर नेण्याच्या या प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्तविकात डॉ. संजय मालपाणी यांनी फेडरेशनची स्थापना झाल्यानंतरचा परीक्षक प्रशिक्षणाचा पहिलाच कार्यक्रम संगमनेर या ऐतिहासिक नगरीत होणे हा योगअमृत असल्याचेही सांगीतले. डॉ. जयदीप आर्य यांनी या कार्याची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून होत असल्याचा आनंद व्यक्त केला. सूत्रसंचालन गिरीश डागा यांनी केले तर उमंग द्वान यांनी आभार मानले.

यावेळी फेडरेशनचे महासचिव तथा एस व्यासा विद्यापिठाचे कुलपती डॉ.एच.आर.नागेंद्र व नॅशनल फेडरेशनचे महासचिव डॉ.जयदीप आर्य आदी मान्यवर ऑनलाईन प्रणालीद्वारा तर नॅशनल योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.ईश्‍वर बसवशेट्टी, उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, योगाचार्य निरंजन मूर्ती, उमंग द्वान, कार्यक्रमाचे समन्वयक सतीश मोहगावकर व पतंजली योग समितीचे समन्वयक भालचंद्र पडाळकर आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity to take India great culture to the global level