esakal | दूध उत्पादकांना योग्य दर देण्यास महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

Opposition of some ministers in Mahavikas Aghadi to give fair rates to milk producers

दूध दराचा प्रश्न निर्माण होण्यास केंद्र सरकार व राज्यातील गेल्यावेळेसचे भाजपचे सरकार कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

दूध उत्पादकांना योग्य दर देण्यास महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचा विरोध

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : दूध दराचा प्रश्न निर्माण होण्यास केंद्र सरकार व राज्यातील गेल्यावेळेसचे भाजपचे सरकार कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना भाजपचे नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. 

दूध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे. दुधाला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांतर्फे पुकारलेल्या आंदोलनात भाजपने उडी घेतली आहे. १ ऑगस्टला दूध उत्पादक बंद पाळणार आहेत. भाजपने दूध आंदोलनासाठी नगर जिल्ह्यात संगमनेर हे केंद्र बनविले आहे. 

आज विखे यांनी अकोले संगमनेरमध्येच यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली. थोरातांनी यासंबंधी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस आणि भाजप असा हा विषय असला तरी नगर जिल्ह्यात याला विखे पाटील विरुद्ध थोरात असेच स्वरूप येत आहे. विशेष म्हणजे दोघांच्याही आपापल्या मतदारसंघात दूध संस्था कार्यरत आहेत.

अकोलेमध्ये बोलताना विखे म्हणाले, ‘महायुती सरकारच्या काळात जी मंडळी दुधाच्या अनुदानासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारच्या विरोधात घोषणा देत होती आज तीच माणसं सत्तेत आहेत. परंतु त्यांना आपल्याच घोषणांचा सोयीस्कर विसर पडला आहे. दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेवून मागील सरकारने पाच रुपयांचे अनुदान देवून यासाठी निधीची तरतूद केली. मग आताच्या सरकारला अडचण काय आहेॽ दूध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास या सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे.

गेली अनेक वर्षे दूध संघ चालविणारे आणि ‘महानंदा’ संस्थेची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तरी अडचणीच्या काळात दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शेतीच्या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, आता दुधाला भाव मिळत नसल्याने उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्या राज्याला शोभणाऱ्या नाहीत. याबाबत निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजप आक्रमक भूमिका घेऊन सरकारला अफचणीत आणण्याचे सुतोवाच’ अकोले येथे केले

संपादन : अशोक मुरुमकर

loading image