पिकावरील हट्टी बोंडअळी हटेना, शेतकरी मेटाकुटीला

सूर्यकांत नेटके
Sunday, 13 December 2020

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी सुमारे 1 लाख 40 हजार हेक्‍टरहून अधिक अधिक क्षेत्र बोंडअळीच्या विळख्यात सापडले होते.

नगर ः कापसावरील बोंडअळीचे प्रतिबंधात्मक निर्मुलनासाठी कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात तब्बल 46 लाख रुपये खर्च केला. त्यातील 20 लाखांचा खर्च लोकांनी केला. मात्र, लाखो रुपये खर्चूनही कापसावरील बोंडअळीचा सर्वनाश झालेला नाही. त्यामुळे बोंडअळी निर्मुलनावरील खर्च वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा - आमदार बबनदारांना कोरोनाची लागण

जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासे, जामखेड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. अलिकडे कर्जत, श्रीगोंदे, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्‍यातील बागायती पट्ट्यातही कापसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्‍टरवर कापूसलागवड झाली. मात्र, काही वर्षांपासून कापसावरील बोंडअळीचे संकट हटताना दिसत नाही.

जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी सुमारे 1 लाख 40 हजार हेक्‍टरहून अधिक अधिक क्षेत्र बोंडअळीच्या विळख्यात सापडले होते.

त्या वेळी कृषी विभागाने केलेल्या उपाययोजना, जागृतीमुळे वर्षभरात बोंडअळीचा विळखा सैल झाला. त्यामुळे नगर जिल्हा कृषी विभागाचा राज्य पातळीवर गौरवही झाला. अतिवृष्टीमुळे यंदा कापूसउत्पादक अडचणीत आहेत. त्यात बोंडअळीचाही फटका बसला आहे. कृषी विभागाने बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे होते. मात्र, तसे झाले नाही.

कृषी विभागाने यंदा बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत तब्बल 26 लाख रुपये खर्च केले. त्यात 2 लाख 17 हजार रुपयांचे प्रोफेनोफॉस औषधे, 3 लाख 39 हजारांचे इमिडाक्‍लोप्रिड वाटप केले. तब्बल 13 लाख 52 हजारांचे कामबंद सापळे वाटले. बोंडअळी नियंत्रणासाठी घेतलेल्या शेतीशाळांवर 6 लाख 44 हजार रुपये खर्च झाले.

शिवाय 49 हजार 500 रुपये हे पत्रिकांवरच खर्च केले. या खर्चात शेतकऱ्यांचा वाटा 50 टक्के आहे. मात्र, एवढा खर्च होऊनही बोंडअळी हटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे हा खर्च व्यर्थच गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

पहिल्या वेचणीनंतर आलेल्या कापसाच्या प्रत्येक दोडीत बोंडअळी आढळली. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाने उपाययोजना अथवा जागृती केली नाही. एका गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी असताना, एक-दोन शेतकऱ्यांनाच सापळे मिळाले. कृषी विभागाने बोंडअळीच्या निर्मुलनाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते.
- हरिभाऊ केसभट, गायकवाड जळगाव, ता. शेवगाव
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreaks of bollworm on crops