
कांदापिकावर पांढऱ्या सड रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याने, कृषी विभागातर्फे कांदाउत्पादकांना मार्गदर्शन केले जात आहे.
श्रीरामपूर (अहमदनगर) : सध्या कांदापिकावर पांढऱ्या सड रोगाचा प्रादुर्भाव दिसल्याने, कृषी विभागातर्फे कांदाउत्पादकांना मार्गदर्शन केले जात आहे. कांदालागवडीनंतर काही दिवसांतच रोप मुळापासून सडत आहे.
कांद्यावर पांढरी सड नावाचा रोग असून, जमिनीतील हानीकारक बुरशीमुळे कांद्याच्या मुळांना बाधा येते. त्यानंतर कांद्याच्या कंदात बुरशी शिरल्याने मुळे आणि कंद सडते. रोगाच्या प्रारंभी कांद्याची पात पिवळसर पडून जमिनीवर पडते आणि वाळून जाते. जमिनीत ओलावा असल्याने, बुरशीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. कांद्यावरील पांढऱ्या सड रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन कांदापीक विशेषतज्ज्ञ भरत दवंगे यांनी केले आहे.
कृषी विभाग व आत्मा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी अशोक साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनतपूर परिसरातील कांदाउत्पादकांना मार्गदर्शन करण्यात आले. दवंगे म्हणाले, की कांद्याची पुनर्लागवड करण्याच्या वेळी कांद्याचे रोप दोन टक्के कार्बेन्डॅझीम बुरशीनाशक द्रावणात 10 मिनिटे बुडविल्यानंतर कांदालागवड करावी. कांदालागवडीपूर्वी जमिनीत मेटॅलिक्झील चार टक्के अधिक 64 टक्के डब्ल्यूडब्ल्यूपी अथवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के अधिक मेंकोक्केब 63 टक्के डब्ल्यू पी अथवा पायरॅक्लोस्टोबीन पाच टक्के अधिक मेटीराम 55 टक्के डब्ल्यू जी बुरशीनाशकांचा रासायनिक खतासोबत प्रति एकरी एक किलोच्या प्रमाणात वापर करावा.
बुरशीनाशकांचा एक किलो प्रतिएकर 300 लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचींगद्वारे वापरावे. तसेच कांदापिकात अन्नद्रव्यांचा वापर करताना एकरी 20 किलो दाणेदार गंधक वापरावे. तसेच पोटॅश अन्नद्रव्याची मात्रा एकरी 15 किलोच्या प्रमाणात वाढवावी. तातडीने उपाययोजना केल्यास, कांद्याचे पांढरी सड रोगापासून संरक्षण होऊन मोठे नुकसान टळणार असल्याचे दंवगे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी अश्विनी गोडसे, एम. के. साळुंके, एम. एम. बढे, ए. डी. मानकर यांनी परिश्रम घेतले.
संपादन : अशोक मुरुमकर