16 रुग्णांची कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

80 वर्षांचे वृध्द आणि 2 वर्षांच्या चिमुकलीसह अहमदनगर जिल्ह्यात आज 16 रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर 13 आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

नगर : शहरात आठवडाभरापासून रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यात आडते बाजार परिसरात सहा बाधित रुग्ण आढळून आल्यावर जिल्हा प्रशासनाने हा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला. त्या जवळील भाग बफर झोन जाहीर केल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा एकदा 14 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मुख्य भाग कंटेन्मेंट झोन झाल्याने शहराची वाटचाल संपूर्ण लॉकडाउनच्या दिशेने दिसत आहे. 

80 वर्षांचे वृध्द आणि 2 वर्षांच्या चिमुकलीसह अहमदनगर जिल्ह्यात आज 16 रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर 13 आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण संख्या आता 307 झाली असून उपचार घेत असलेल्या (ऍक्‍टिव) रुग्णांची संख्या ही 101 इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी 55 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. 

केडगाव, डाळमंडई, तसेच इतर भागातही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आडते बाजारातील व्यापाऱ्यांनी तीन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आडते बाजारात दोन दिवसांत सहा बाधित आढळले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी या भागाची पाहणी केली. डाळमंडई, आडते बाजार, तेली खुंट भाग कंटेन्मेंट, तर उर्वरित बाजारपेठ बफर झोन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्य बाजारपेठ 12 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. 

तोफखाना भागात सापडलेल्या रुग्णांपैकी काही जण कापड बाजारातील एका मोठ्या वस्त्रदालनात काम करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे हे दुकानही तातडीने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आज संपूर्ण कापड बाजारासह गंजबाजार, डाळमंडई, तसेच इतर बाजारपेठाही पूर्ण बंद आहे. आज बफर झोनमध्ये केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची विक्रीची दुकाने उघडी होती. गंजबाजारमध्ये भाजीपाला विक्री करण्यासाठी विक्रेते आले होते. 

किराणा, तसेच इतर होलसेल दुकाने याच भागात आहेत. काही दिवसांपासून येथे मोठी गर्दी होत होती. त्यामुळे येथून बाधा झाल्यास जिल्हाभर रुग्ण वाढण्याची शक्‍यता असल्याने हा भाग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Overcoming corona of 16 patients