मुळा धरणाचे 11 दरवाजे उघडले; विद्युत निर्मितीसाठी 620 क्युसेक पाणी

विलास कुलकर्णी
Tuesday, 1 September 2020

मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी (ता. १) सकाळी नऊ वाजता प्रत्येकी एक इंच उघडण्यात आले आहेत.

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी (ता. १) सकाळी नऊ वाजता प्रत्येकी एक इंच उघडण्यात आले आहेत. धरणातून दोन हजार क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी जायकवाडी धरणासाठी मुळा नदीपात्रातून झेपावले.

मंगळवारी दुपारी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी उजव्या कालव्यातून विद्युत निर्मितीसाठी ५०० क्युसेकने तर, डाव्या कालव्यातून १२० क्युसेकने मुसळवाडी तलाव भरण्यासाठी सोडले जाणार आहे. असे मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाल्याने देशभरात शासकीय दुखवटा आहे. त्यामुळे, जलसंपदा खात्यातर्फे धरणाच्या जलपूजनाचा शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आला. कार्यकारी अभियंता पाटील, मुळा धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे व धरणावरील कर्मचाऱ्यांनी धरणाचे दरवाजे उघडून, नदीपात्रात विसर्ग सुरू केला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुळा धरणात लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून ३,८२२ क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. 

धरणसाठा २५,४४४ दशलक्ष घनफूट झालेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने आज नवीन पाण्याची आवक घटली.  देसवंडीपासून पुढे मुळा नदी पात्रात अगोदरच देव नदीचे पाणी आहे. त्यात, मुळा धरणातून नदीपात्रात सोडलेल्या विसर्गाची भर पडणार आहे. त्यामुळे, मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी मुळा नदीचे पाणी जायकवाडी धरणात वेगाने पोहोचणार आहे.

मुळा धरण परिचलनानुसार १५ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले जाणार आहे. तोपर्यंत धरणसाठा २५,४३८ दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून, धरणात येणारे नवीन पाणी मुळा नदी पात्रात सोडले जाणार आहे.  धरणात येणाऱ्या नवीन पाण्याची आवक कमी जास्त होईल. तसे धरणातून विसर्ग वाढविला किंवा कमी केला जाणार आहे.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, मुळा धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी वांबोरी उपसा योजनेद्वारे सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने, वांबोरी योजनेच्या पंप हाऊस व व्हॉल्वच्या देखभाल दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. येत्या तीन-चार दिवसात वांबोरी योजनेतून आवर्तन सुरू होईल.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The overflow water of Mula dam in Rahuri taluka was released from right and left canals