esakal | शिर्डीचे विमानतळ नाईट लँडींग सेवेसाठी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Overnight landing will start from Shirdi Airport

शिर्डी येथील विमानतळ नाईट लॅण्डींग सेवेसाठी सज्ज झाले आहे. साईमंदिर सुरू झाल्यानंतर आता देशातील प्रमुख महानगरे हवाईसेवेद्वारे साईबाबांच्या शिर्डीसोबत जोडण्याचा मार्ग मोकळा झाला..

शिर्डीचे विमानतळ नाईट लँडींग सेवेसाठी सज्ज

sakal_logo
By
सतीश वैजापूकर

शिर्डी (अहमदनगर) : येथील विमानतळ नाईट लॅण्डींग सेवेसाठी सज्ज झाले आहे. साईमंदिर सुरू झाल्यानंतर आता देशातील प्रमुख महानगरे हवाईसेवेद्वारे साईबाबांच्या शिर्डीसोबत जोडण्याचा मार्ग मोकळा झाला. येथे विमानांचे पार्किंग तसेच बेस स्टेशनची सुविधा सुरू होईल. विमानतळाचे उत्पन्न व रोजगाराच्या संधी वाढतील, परिसराच्या विकासाला चालना मिळेल. शिर्डी परिसराच्या दृष्टीने हि एक गुड न्युज आहे.

खरे तर तिन वर्षापूर्वीच नाईट लॅण्डींग सुविधा सुरू व्हायला हवी होती. मात्र अनुभव नसलेल्या विमानतळ विकास प्राधिकरणाकडे हे विमानतळ उभारण्याचे आणि चालविण्याचे काम देण्यात आल्याने हि सेवा रखडली. त्यामुळे परिसराचा विकास देखील रखडला. मात्र यावेळी प्राधिकरण्याच्या अधिका-यांनी हि सेवा सुरू करून सहा महिन्यांचा लाॅकडाऊनचा काळ सार्थकी लावला. आता या विमानतळावर आता रात्री देखील विमाने ये जा करू शकतील. रात्री विमानांसाठी विमानतळांचे भाडे कमी असते. तसेच प्रवासी तिकीट देखील कमी असते. त्यामुळे विवीध महानगरातून येथे विमानसेवा सुरू होतील. विमानांच्या फे-या आणि प्रवाशांची संख्या वाढेल. 

सध्या विमाने उभी करण्यासाठी येथे चार बे (पार्किंग) आहेत. आणखी चार बे चे काम अंतिम टप्प्यात आहेत. आठ विमानांसाठी पार्किंग सुविधा तयार झाली आहे. मुंबई व पुणे विमानतळाचे भाडे अधिक आणि तुलनेत क वर्ग असल्याने शिर्डी विमानतळाचे भाडे निम्म्याने कमी आहे. त्यामुळे येथे विविध कंपन्यांनी विमाने पार्किंगसाठी येऊ लागतील. विस्तारा या दाक्षिणात्य विमान कंपनीने शिर्डी ते नांदेड व शिर्डी ते तिरूपती अशी हवाई सेवा सुरू करण्याबाबत या विमानतळाच्या अधिका-यांकडे यापूर्वीच विचारणा केली आहे. 

हवामान खराब असले की मुंबई विमानतळावर उतरणारी विमाने एकतर शेजारी अहमदाबाद किंवा गोव्याच्या विमानतळावर उतरावी लागतात. विमान कंपन्यांना त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. आता अवघ्या विस मिनीटांच्या अंतरावर असलेले शिर्डी विमानतळ त्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यातून विमानतळाला उत्पन्न मिळेल. शिर्डीतील हाॅटेल व्यावसाईक व वहानमालकांचा व्यवसाय वाढेल. या विमानतळावर इंडीयन आॅईल कंपनीचा इंधन डेपो आहे. अन्य शहरांच्या तुलनेत येथे इंधनाचा दर कमी आहे. इंधन भरण्यासाठी कंपन्या या विमानतळाला प्राधान्य देतील. 

दिपक शास्त्री (संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण) : शिर्डी विमानतळावर नाईट लॅण्डींग सुविधा सुरू झाली आहे. डीसीजीए ची परवानगी मिळाली की हि सेवा सुरू होईल. त्यामुळे विवीध महानगरातून विमानांच्या फे-यात मोठी वाढ अपेक्षीत आहे. कार्गो सेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे. मात्र सध्या कोविडचा कहर सुरू आहे. भविष्यात हि सेवा सूरू केली जाईल. राहाता कृषि उत्पन्न बाजार समिती सोबत आमची प्राथमिक चर्चा झाली. इच्छुक असलेल्या विमान कंपन्यांसोबत देखील चर्चा करता येईल. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top