
शहरात ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल प्रशासनाची धावपळ पाहता. शेवगावकरांच्या मदतीला चिलेखनवाडी येथील लोचनबाई पुरी ऑक्सिजन इंडस्ट्रीज धावून आली आहे.
चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्लॅन्ट शेवगावकरांसाठी ठरतोय संजीवनी
शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवण्यासाठी शेवगाव नजिकच्या चिलेखनवाडी येथील ऑक्सिजन प्लॅन्ट संजीवनी ठरत असून तेथून नियमीत मिळणा-या दैनंदिन १२० सिलिंडरमुळे शेवगाव तालुक्यातील हॉस्पिटल व रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होत आहे. इतर शहरात ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक व हॉस्पिटल प्रशासनाची धावपळ पाहता. शेवगावकरांच्या मदतीला चिलेखनवाडी येथील लोचनबाई पुरी ऑक्सिजन इंडस्ट्रीज धावून आली आहे.
शेवगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यात ३७८१ वर पोहचली आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोना बाधीत गंभीर रुग्णांसाठी उपचार करणा-या आठ रुग्णालयात आय.सी.यू -२१, व्हेंटीलेटर -४, ऑक्सिजन ११०, आयसोलेशन-६५ अशी बेड संख्या उपलब्ध आहे. तर शासकीय व विविध संस्था व पदाधिका-यांनी सात ठिकाणी सुरु केलेल्या कोवीड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या बाधीत रुग्णांसाठी ६५० बेड उपलब्ध आहेत. या दोन्ही ठिकाणी तालुक्यातील बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच अतिगंभीर रुग्ण मोठया शहरामध्ये खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तालुक्यातील रुग्णांसाठी लागणा-या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा शेजारच्या नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथील पुरी ऑक्सिजन इंडस्ट्रीज मधून केला जातो. तेथून नियमीत १२० सिलेंडर उपलब्ध होत असल्याने तालुक्यातील उपचार घेणा-या नातेवाईकांची व रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी होणारी भटकंती थांबली आहे. इतर शहरातील ऑक्सिजन पुरवठयाची परिस्थिती गंभीर असतांना शेवगाव पासून अवघ्या १५ ते २० किमी असलेल्या या प्लॅन्टने शेवगावला ख-या अर्थाने प्राणवायू पुरवून शेजार धर्माची जाणीव करुन दिली आहे. सध्या नगर जिल्ह्यातील इतर शहरांचा व रुग्णालयांचा भार या प्लॅन्टवर टाकण्यात आला असला तरी शेवगावकरांना मात्र संचालक बजरंग पूरी यांनी त्यांची कधी उणीव भासुन दिली जात नाही.
तालुक्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गंभीर परिस्थितीत प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तालुका प्रशासनाचे तहसिलदार अर्चना भाकड, नायब तहसिलदार मयूर बेरड, गट विकास अधिकारी महेश डोके, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे विशेष दक्ष आहेत. प्रसंगी चिलेखनवाडी येथील प्लॅन्टवर जावून स्वत: ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी अधिका-यांची मदत होत असल्याने तालुक्यातील रुग्णांसाठी ते देवदूत म्हणून काम करीत आहेत.
Web Title: Oxygen Is Being Supplied To Hospitals And Patients In Shevgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..