esakal | लोहारेतून होईल रोज ५०० सिलिंडर अॉक्सीजननिर्मिती

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder
लोहारेतून होईल रोज ५०० सिलिंडर अॉक्सीजननिर्मिती
sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिर्डी ः संगमनेर तालुक्‍यातील लोहारे येथील ऑक्‍सिजननिर्मिती प्लॅंट दररोज पाचशे ते सहाशे ऑक्‍सिजन सिलिंडरचे उत्पादन करण्यास सज्ज आहे. मात्र त्याला लिक्विड ऑक्‍सिजन पुरवठ्याची गरज आहे. जिल्ह्यातील मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला, तर उद्यापासूनच ऑक्‍सिजन टंचाई दूर होऊ शकते.

पुरेशा ऑक्‍सिजन पुरवठ्याअभावी जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील रुग्णांचा जिव टांगणीला लागला. वेळेवर ऑक्‍सिजन न मिळाल्याने रुग्णांवर जीव गमावण्याची वेळ येते.

न भुतो न भविष्यंती असे संकट उभे ठाकले. या जिवघेण्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एक उपाय पुढे आला आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत ही कमालीची आशादायक बातमी आहे. प्लॅंटधारक कृष्णा पोकळे व बाळासाहेब पोकळे यांना वैद्यकीय ऑक्‍सिजननिर्मितीचा परवाना हवा होता.

कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, तेथील औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास यश देखील आले. त्यात सुरक्षा हा सर्वांत महत्त्वाचा आणि जोखमीचा विषय असतो. त्यादृष्टीने या प्लॅंटसाठी पेसो (पेट्रेलियम सिक्‍युरिटी) सर्टिफिकेट त्यांना मिळाले.

सायंकाळपर्यंत पेसोचे सिलिंडर भरण्यासाठीचे सर्टिफिकेट देखील मिळेल. आता या प्लॅंटसाठी लिक्विड ऑक्‍सिजन मिळाला की उद्यापासून तेथे तातडीने पाचशे ते सहाशे वैद्यकीय ऑक्‍सिजन सिलिंडरनिर्मिती होऊ शकते. त्यातून जिल्ह्यातील ऑक्‍सिजन टंचाई दूर होण्यास मदत होईल.

याबाबत माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले, ""चाकण येथील चार-पाच पुरवठादार लिक्विड ऑक्‍सिजन पुरवतात. मात्र त्यांच्यासाठी सध्या नवी नियमावली तयार करण्यात आली. हा प्लॅंट नवा असल्याने त्याचे नाव पुरवठादाराच्या यादीत यायला हवे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला, तर ही समस्या मार्गी लागू शकेल. लिक्विड ऑक्‍सिजनचे वायुरूप ऑक्‍सिजनमध्ये रूपांतर करणारा हा प्लॅंट आहे.''

सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना हा प्लॅंट सुरू करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार द्यायला हवे होते. तसे झाले असते, तर पाच-सात दिवसांपूर्वीच जिल्ह्यासाठी पाचशे ते सहाशे वैद्यकिय ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध झाले असते. आता तरी युद्धपातळीवर हालचाली करून हा प्लॅंट उद्यापासून कुठल्याही परिस्थितीत सुरू करायला हवा.

- विवेक कोल्हे, अध्यक्ष, कोपरगाव औद्योगिक वसाहत

- बातमीदार - सतीश वैजापूरकर